मुंबई : मुंबईतील झाडांवर करण्यात आलेली रोषणाई सात दिवसात हटवावी, असे लेखी आदेश महापालिका प्रशासनाने सर्व विभाग कार्यालयांना दिले आहेत. तसेच रोषणाई हटविण्यात येत नाही, तोपर्यंत दिवे बंद ठेवावेत, असेही आदेश देण्यात आले आहेत. मुंबईतील सर्व झाडांवरील रोषणाई २३ एप्रिलपर्यंत हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
उच्च न्यायालयाने झाडांवरील रोषणाईवरून मुंबई महापालिकेला फटकारले असून मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयांनी गेल्या सोमवारपासून आपापल्या हद्दीतील झाडांच्या खोडांवरील दिव्यांची माळ हटवण्यास सुरूवात केली. मात्र काही विभागांमधील झाडांवरील रोषणाई तशीच होती. त्यामुळे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी झाडांवरील सर्व रोषणाई हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता यांत्रिकी आणि विद्युत विभागाने सर्व विभाग कार्यालयांसाठी लेखी आदेश काढले आहेत. सात दिवसात झाडांवरील दिवे काढावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
हेही वाचा…पनवेल – नांदेडदरम्यान ४० उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या
‘जी २०’ परिषदेच्या वेळी परदेशी पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी मे २०२३ मध्ये एएससी पॉवर प्रा. लि. या कंपनीला विभाग कार्यालयांनी रोषणाईचे कंत्राट दिले होते. मात्र ‘जी २०’ परिषद संपून परदेशी पाहुणे आपापल्या देशात गेले तरी रोषणाई हटवण्यात आलेली नाही. झाडांवर केलेली दिव्यांची सजावट प्रकाश प्रदूषण करणारी असून ती पक्षी आणि झाडांवरील कीटकांसाठी धोकादायक ठरत असल्याच्या कारणास्तव उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने या याचिकेची गंभीर दखल घेतली. तसेच राज्य सरकारसह मुंबई महानगरपालिकेलाही नोटीस बजावली होती. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयांनी आता ही रोषणाई हटवण्यास सुरूवात केली आहे. दिव्यांच्या सजावटीचा झाडांवर आणि त्यावर अधिवास करणारे पक्षी व कीटकांवर परिणाम होत असल्याने त्याबाबत पर्यावरणप्रेमींनी ही याचिका केली होती.
हेही वाचा…दादर रेल्वे स्थानकावर लॉरेन्स बिष्णोई टोळीचा गुंड, पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाला दूरध्वनी
रोषणाईचे काम करणाऱ्या कंत्राटदाराकडून झाडांवरील दिवे काढून घेण्यात येणार आहेत. पालिकेच्या विभाग कार्यालयांमधील संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांनी त्याकरीता सहकार्य करावे, असेही या लेखी आदेशात म्हटले आहे. तसेच ही रोषणाई हटवली जात नाही तोपर्यंत ती किमान बंद ठेवावी, असेही आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. रोषणाईसाठी वापरलेली दिव्यांच्या माळा काढून पालिकेच्या गोदामामध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.