प्रसाद रावकर, लोकसत्ता
मुंबई : दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची निर्मितीस्थळीच विल्हेवाट लावून मुंबईत शून्य कचरा मोहीम राबविण्याची योजना मुंबई महानगरपालिकेने आखली आहे. भविष्यात कचऱ्याचे विकेंद्रीकरण करून २४ विभाग कार्यालयांच्या स्तरावरच विल्हेवाट लावण्यात येणार आहे. कचराभूमीत कचरा नेण्याची वेळ येऊ नये ही त्यामागची संकल्पना आहे. त्याचबरोबर कचरा विलगीकरण, छोटय़ा कचराकुंडय़ांचे वाटप आदींबाबतच्या धोरणात आमूलाग्र बदल करण्याचा मुंबई महानगरपालिकेचा मानस आहे.
मुंबईमध्ये दररोज ५७०० ते ६३०० मेट्रीक टन कचरा निर्माण होतो. हा कचरा देवनार, कांजूर आणि मुलुंड येथील कचराभूमीत टाकण्यात येतो. मात्र तिन्ही कचराभूमींची क्षमता संपुष्टात आली असल्याने वाढत्या कचऱ्याच्या विल्हेवाटीचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे. क्षमता संपुष्टात आलेल्या कचराभूमींमध्ये भविष्यात कचरा जाऊ नये यादृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचाच भाग म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या २४ विभाग कार्यालयांच्या स्तरावरच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. त्यामुळे कचराभूमींवरील कचऱ्याचा भार कमी होईल, असा विश्वास मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यासाठी कचरा विलगीकरण, कचराकुंडय़ा वाटप आदींबाबतचे धोरण आणि नियमांमध्ये काही फेरबदल करण्यात येत आहेत, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबईत दिवसेंदिवस वाढणारा कचरा, कचराभूमींची संपुष्टात आलेली क्षमता लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने नवी सकारात्मक योजना आखण्यास सुरुवात केली आहे. या योजनेंतर्गत संपूर्ण मुंबईतच शुन्य कचरा मोहीम राबविण्याचा विचार सुरू आहे. घरोघरी निर्माण होणाऱ्या कचऱ्याची तेथेच विल्हेवाट लागावी यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. कचऱ्याच्या विलगीकरणाबाबतच्या धोरणात फेरबदल करण्यात येत आहेत. घरोघरी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे तेथेच वर्गीकरण करून ओला-सुका कचरा वेगळा करण्यात येणार आहे. सुका कचरा पुनर्वापरासाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. सोसायटय़ा आणि कचरा पुनर्वापर करणाऱ्यांमध्ये समन्वय साधण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर विभागांमध्ये सुका कचरा गोळा करण्यासाठी स्वतंत्र केंद्र सुरू करण्याचा मानस आहे. तसेच सोसायटीत ओल्या कचऱ्यापासून तयार करण्यात येणाऱ्या खताची संबंधित संस्थांमार्फत चाचणी करण्यात येईल. उच्च दर्जाच्या खताला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले. भविष्यात मुंबईमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावताना त्यावर माहिती आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने नजर ठेवण्यात येईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.