मुंबई : महाराष्ट्रासह देशातील ११ राज्यांमध्ये उन्हाचा पारा वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या सर्व रुग्णालयांमध्ये दोन खाटा असलेले शीतकक्ष उभारले आहेत. नागरिकांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाही महानगरपालिकेने सज्ज केले आहेत.
मुंबई महानगरपालिकेने वैद्यकीय महाविद्यालयांबरोबरच १४ रूग्णालयात उष्माघात बाधित रूग्णांसाठी दोन रुग्ण खाटा शीत कक्ष कार्यरत केले आहेत. तसेच प्रशिक्षित कर्मचारीही नेमले आहेत. तसेच मुंबई महानगरपालिकेने २५० पैकी १०३ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांमध्येही वातानुकूलित व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.
हेही वाचा…Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर
रुग्णांना थंड वातावरण उपलब्ध व्हावे यासाठी आपला दवाखानामध्ये वातानुकूलन यंत्रणेबरोबरच कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आपला दवाखानामधील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना उष्माघात नियंत्रण व प्रतिबंधासाठी प्रशिक्षणही देण्यात आले आहे. यामध्ये उष्माघातावरच्या उपाययोजनांवर मार्गदर्शन, उपचार आणि घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली आहे.
वाढत्या तापमानामुळे नागरिकांना विशेषतः लहान मुले, वयोवृद्ध आणि घराबाहेर काम करणाऱ्या नागरिकांना उष्माघात होण्याची शक्यता असते. उष्माघात झाल्यास घ्यावयाची काळजीबाबत जनजागृती करत नागरिकांना माहिती देण्यात येत आहे. – डॉ. दक्षा शहा, कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महानगरपालिका