चोवीस तास पाण्याची सवय असलेल्या मुंबईकरांना आता पाणी जपून वापरावे लागणार आहे. महापालिकेने १६ जूनपासून पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने घरगुती पाणीवापरासाठी दोन गट केले आहेत. एका गटात झोपडपट्टीवासीय, तर दुसऱ्या गटात चाळी-सोसायटय़ांचा समावेश आहे. झोपडपट्टीवासीयांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रतिहजार लिटरमागे २४ पैसे जादा मोजावे लागणार आहेत तर सामान्य मुंबईकरांना ३२ पैसे जादा मोजावे लागणार आहेत.
नगरसेवकनिधी, विकासनिधीला कात्री लावणारे पालिकेचे माजी आयुक्त सुबोध कुमार यांनी वाढता खर्च भरून काढण्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये पाणीपट्टीत दरवर्षी आठ टक्के वाढ करण्याचे प्रस्तावित केले होते. या अर्थसंकल्पाला शिवसेना-भाजपने मंजुरी दिली होती. त्यावेळी विरोधी पक्षांकडूनही त्यास फारसा विरोध झाला नाही. त्यामुळे आता मुंबईकरांना दरवर्षीच पाणी दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. स्थायी समितीच्या शुक्रवारच्या बैठकीत केवळ सदस्यांच्या माहितीसाठी हा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
अशी असेल दरवाढ (प्रतिहजार लिटरसाठी)
* झोपडपट्टीवासीय : ३.२४ रुपये (पूर्वीचा दर : तीन रुपये)
* सर्वसामान्य मुंबईकर : ४.३२ रुपये (पूर्वीचा दर : चार रुपये)
व्यावसायिक वापरासाठीचा दर (प्रतिहजार लिटरसाठी)
* विविध संस्था, उद्योगधंदे आणि कारखाने : ४३.२० रुपये
* थ्री-स्टार हॉटेल्स : ६४.८० रुपये (यापूर्वीचा दर ४० रुपये)
* रेसकोर्स : ६४.८० रुपये (यापूर्वीचा दर ६० रुपये)
पालिकेच्या तिजोरीत संभाव्य भर : ७३.४४ कोटी रुपये
यात बदल नाही : मीटर भाडे, सुरक्षा ठेव, इतर आकार आणि शुल्क.