मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर ८४ जीवरक्षक तैनात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तसेच यापैकी ३८ जीवरक्षकांच्या नियुक्तीमध्ये समुद्रकिनाऱ्यालगतच्या कोळीवाडय़ांतील कोळी-आगरी तरुणांना प्राधान्य देण्यात येणार आहे.मुंबईला विस्तृत समुद्रकिनारा लाभला आहे. गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा, गोराई इत्यादी समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटक मोठय़ा संख्येने जातात. काही पर्यटक उत्साहाच्या भरात समुद्रात पोहण्याचा आनंदही लुटतात. पावसाळ्यात भरती-ओहोटीचा, तसेच खड्डय़ांचा अंदाज न आल्यामुळे गेल्या काही वर्षांत अनेक पर्यटकांना प्राण गमवावे लागले आहेत. पावसाळ्यात समुद्रकिनाऱ्यांवर असे प्रकार घडू नयेत यासाठी पालिकेने सुरक्षिततेची बाब म्हणून चौपाटय़ांवर ८४ जीवरक्षक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या पालिकेच्या सेवेत १२ जीवरक्षक कायमस्वरुपी असून हंगामी कंत्राटी पद्धतीवर ३४ जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच किनाऱ्याजवळील कोळीवाडय़ांतील ३८ कोळी- आगरी तरुणांची जीवरक्षक म्हणून नेमणूक करण्यात येणार असून त्यांना मानधन देण्यात येणार आहे, असे अग्निशमन दलातील अधिकारी संतोष सावंत यांनी सांगितले.