गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पुन्हा एकदा एमएमआरडीए, एमएसआरडीएसह २८ प्राधिकरणांना त्यांच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी स्मरणपत्र पाठविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र तरीही खड्डे बुजविण्यात आले नाहीत, तर तो रस्ता पालिकेचा नसून तो संबंधित प्राधिकरणांचा असल्याचे पत्र जवळच्या पोलीस ठाण्याला द्यावे, असे आदेश पालिका आयुक्तांनी अभियंत्यांना दिले आहेत.
गणेशोत्सव जवळ आल्यामुळे रस्त्यांवरील उर्वरित खड्डे तातडीने बुजविण्यासाठी पालिकेने एमएमआरडीए, एमएसआरडीसी, म्हाडा, मुंबई पोर्ट ट्रस्ट, नौदल, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह २८ यंत्रणांच्या प्रतिनिधींना बैठकीस बोलावले होते. मात्र या बैठकीस एकाही प्राधिकरणाचा प्रतिनिधी आला नाही. त्यामुळे खड्डेमय रस्त्यांची यादी तयार करण्याचे आदेश पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी रस्ते विभागातील अभियंत्यांना दिले आहेत.
खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने अनेक वेळा या प्राधिकरणांना पत्र पाठविली आहेत. अन्य प्राधिकरणांच्या अखत्यारितील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची जबाबदारी पालिकेची नसताना नागरिकांचा रोष पत्करावा लागतो. या यंत्रणांनी वेळीच खड्डे बुजविले नाहीत, तर संबंधित रस्ते पालिकेचे नाहीत, असे जवळच्या पोलीस ठाण्याला कळवावे, असे आदेश अभियंत्यांना देण्यात आल्याची माहिती पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.