मुंबई : जागोजागी नेत्यांना शुभेच्छा देणाऱ्या फलकांनी भरलेले रस्ते, इमारती, पदपथ दिसत असताना मुंबई फलकमुक्त झाल्याचे दावे प्रशासनाकडून करण्यात येतात. असे असताना आचारसंहिता लागल्यानंतर आता फलक काढून टाकण्याची लगबग प्रशासनाने सुरू केली आहे. मुंबई व दोन्ही उपनगरांतील १२ हजार ३०० फलक केवळ दोन दिवसांत काढून टाकण्यात आले आहेत.
हेही वाचा >>> वृद्धत्व, प्राणी-पक्ष्यांमधील झटापटी, अवयव निकामी झाल्यामुळे प्राणी संग्रहालयातील प्राण्यांचे मृत्यू
जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी याबाबत सोमवारी माहिती दिली. दर म्यान, आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व सार्वजनिक प्राधिकरणे किंवा खासगी मालमत्तांच्या ठिकाणी लावण्यात आलेले फलक तात्काळ हटवून कोनशिला, नामफलक झाकून टाकावेत. तसेच, निवडणुकीच्या आचारसंहितेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आदेश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी दिले. आचारसंहितेचे पालन व त्यासंदर्भातील कार्यवाहीबाबत सोमवारी बैठक घेण्यात आली होती.
हेही वाचा >>> वहीमध्ये लिहिल्याने लैंगिक अत्याचाराचा प्रकार उघड; २१ वर्षीय तरूणाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा
महानगरपालिकेच्या विभागस्तरावरील सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या विभागात राजकीय फलक दिसणार नाहीत, याची काळजी घ्यावी. तसेच, पुढील २४ तासांमध्ये सर्व फलक हटवून, ते पुन्हा लावले जाणार नाहीत, या अनुषंगाने वारंवार पाहणी करावी. वेळेप्रसंगी सार्वजनिक मालमत्ता अधिनियमानुसार, पोलिसांत तक्रारही दाखल करावी. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राजकीय पक्षांना नियमांचे पालन करून फलक लावण्याचा अधिकृत परवानगी देण्यासाठी पालिकेच्या २५ विभाग कार्यालयांमध्ये एकल खिडकी प्रक्रियेची सुविधा उपलब्ध करण्यात यावी. त्यासाठी, प्रत्येक विभागात समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी, जिल्हाधिकारी संजय यादव, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुधाकर शिंदे आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.