मुंबई : मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी रुग्णालयात असलेली हंगामी पदे रद्द करण्याचा निर्णय घेतला असून त्यात वैद्यकीय महाविद्यालये, उपनगरीय रुग्णालये, दवाखाने, प्रसूतिगृहामधील डॉक्टरांसह निम्नवैद्यकीय कर्मचाऱ्यांचा सेवा कार्यकाळ संपल्यानंतर रद्द करण्यात आल्या. मात्र या सेवा रद्द करताना या कर्मचारी व अधिकाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन प्रलंबित ठेवण्यात आले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर वेतन प्रलंबित ठेवण्यात आल्याने जवळपास १२३० कर्मचाऱ्यांच्या समोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे तडकाफडकी घेतलेल्या या निर्णयामुळे रुग्णसेवा पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई महानगरपालिकेने केईएम, शीव, नायर, कूपर या वैद्यकीय महाविद्यालयांसह उपनगरीय रुग्णालये, प्रसूतिगृह आणि दवाखान्यांमध्ये हंगामी पद्धतीने कार्यरत असलेल्या १२३० डॉक्टरांसह निम्नवैद्यकीय कर्मचाऱ्यांची हंगामी सेवेचा कालावधी संपल्याने त्यांची सेवा नियमित न करता संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. त्यात लहान मुलांचे डॉक्टर, कर्करोग तज्ज्ञ, विविध आजारांवरील डॉक्टरांसह प्रयोगशाळा तज्ज्ञ, तंत्रज्ञ, परिचारिका, औषध िवक्रेते यांच्यासह निम्न वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हंगामी पद्धतीने नियुक्त केलेल्या पदांवर एक ते दोन वर्षांत कायमस्वरूपी नियुक्ती करणे आवश्यक होते. मात्र महानगरपालिका प्रशासनाकडून ही नियुक्ती न झाल्याने आयुक्त भूषण गगरणी यांनी हंगामी पद्धतीने भरलेल्या सर्व नियुक्त्या रद्द करण्यासंदर्भातील परिपत्रक ऑगस्टमध्ये काढले होते. या निर्णयाची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे.

हेही वाचा : मुंबई: कोपरीत परवानगीपेक्षा जास्त फटाक्यांची साठवणूक आणि बेकायदा विक्री ? दोषींवर तातडीने कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढणार

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील हंगामी पद्धतीने भरलेली पदे रद्द करण्याच्या निर्णयामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा सर्वाधिक फटका रुग्णसेवेला बसणार आहे. ही पदे रद्द करताना या कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन प्रलंबित ठेवण्यात आले आहे. कांदिवली शताब्दी रुग्णालयातील एका प्रयोगशाळा तज्ज्ञाने सांगितले की, नियुक्ती करताना सेवा कायम करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र आता अचानक सेवा समाप्त करण्यात आली असून दोन महिन्यांचे वेतन प्रलंबित ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आपल्याला मौखिक आदेश देत नोव्हेंबरपासून कामावर न येण्याचे आदेश दिले असल्याचे मुलुंड येथील वीर सावरकर रुग्णालयातील एका डॉक्टरांनी सांगितले. एका अन्य प्रयोगशाळा तज्ज्ञाने दोन महिन्यांचे वेतन अद्याप दिले नसल्याचे सांगितले.

हेही वाचा : कोल्ड प्लेसारख्या कार्यक्रमांच्या ऑनलाईन तिकीट विक्रीतील काळाबाजार रोखा, जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात मागणी

पदे रद्द करण्यात आलेली रुग्णालये

  • केईएम, शीव, नायर आणि कूपर रुग्णालयातील १४१ कर्मचारी
  • १६ उपनगरीय रुग्णालयातील ८२० कर्मचारी
  • सार्वजनिक आरोग्य विभाग – २६९

एकूण – १२३०