मुंबईच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (राणीची बाग) कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान करण्यास बंदी घातली तसेच मतदानासाठी त्यांना रजा नाकारण्यात आली असल्याची अफवा पसरली होती. यावर आता मुंबई महानगरपालिका प्रशासनाने स्पष्टीकरण दिलं आहे. पालिका प्रशासनाने म्हटलं आहे की, या माहितीत कोणतंही तथ्य नाही. सदर माहिती खोडसाळ हेतूने पसरवण्यात आली आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याला मतदान करण्यापासून रोखलेलं नाही. उलट त्यांना मतदान करण्यास अर्ध्या दिवसाची रजा देण्यात आली आहे.
पालिकेने म्हटलं आहे की, सोमवार, दिनांक २० मे २०२४ रोजी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीअंतर्गत मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. मात्र, कोणीतरी खोडसाळ हेतूने वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील कामगारांना मतदान करण्यास बंदी घातल्याची आणि मतदानासाठी त्यांना रजा नाकारण्यात आल्याची अफवा पसरवली आहे. पालिका प्रशासन या अफवेचं खंडण करत असून उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांना असं कोणत्याही प्रकारचं बंधन अधिकाऱ्यांनी घातलेलं नाही. याउलट सर्व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अर्ध्या दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे.
राणीच्या बागेतील जे कर्मचारी सकाळी लवकर वेळेत येतात, त्यांना दुपारच्या वेळेत मतदानासाठी सुट्टी देण्यात आली आहे. तसेच जे कर्मचारी दुपारच्या वेळेत येतात, त्यांना सकाळी मतदान करून अर्ध्या दिवसांनंतर कामावर रुजू होण्याची परवानगी देण्यात आली आहे, असं वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी प्रशासनाच्या वतीने जाहीर केलं आहे. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. दरम्यान, सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यास हातभार लावावा, असं आवाहन मुंबई महापालिकेच्या वतीने मुंबईकरांना करण्यात आलं आहे.
देशात एकूण सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होत असून, पहिल्या टप्प्यातील निवडणूक १९ एप्रिलला पार पडली आहेत. दुसरा टप्पा २६ एप्रिलला, तिसरा टप्पा ७ मे रोजी, चौथा टप्पा १३ मे रोजी पार पडला. तर आता पाचवा टप्पा २० मे रोजी होणार आहे. या पाचव्या टप्पयात मुंबईतील सहा मतदारसंघ आणि दिंडोरी, नाशिक, ठाणे, कल्याण या मतदारसंघांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीचा हा शेवटचा टप्पा आहे.
हे ही वाचा >> “२०१९ मध्ये शिंदेच मुख्यमंत्री झाले असते, पण…”, राऊतांनी सांगितल्या आतल्या घडामोडी; फडणवीस-तटकरेंचा उल्लेख करत म्हणाले…
महाराष्ट्रातील मतदानाचे टप्पे जाणून घ्या\
टप्पा १:- १९ एप्रिल २०२४
टप्पा २ :- २६ एप्रिल २०२४
टप्पा ३ :- ७ मे २०२४
टप्पा ४ :- १३ मे २०२४
टप्पा ५ :- २० मे २०२४
मतमोजणी :- ४ जून २०२४