|| प्रसाद रावकर
जुहूतील रस्ता रुंदीकरणासाठी पालिकेची ‘प्रतीक्षा’ बंगल्याला नोटीस; लगतच्या इमारतीतील जागाही बाधित
जुहू परिसरातील संत ज्ञानेश्वर मार्गाच्या रुंदीकरणासाठी रस्त्यालगतच्या बंगल्यांची जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया मुंबई महापालिकेने सुरू केली आहे. यात अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ‘प्रतीक्षा’ बंगला आणि त्या शेजारच्या उद्योजक के. व्ही. सत्यमूर्ती यांच्या सत्यमूर्ती रेसिडन्सीच्या आवारातील आठ-नऊ फूट जागा बाधित होणार आहे. सत्यमूर्ती रेसिडन्सीची जागा लवकरच ताब्यात घेण्यात येणार असून अमिताभ बच्चन यांना जागा ताब्यात घेण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.
जुहू परिसरातील एन. एस. रस्ता क्रमांक १० येथून जुहू चंदन चित्रपटगृहाकडून इर्ला उदंचन केंद्राकडे जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर मार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न भेडसावत असतो. या परिसरात एक शाळा, दोन मॉल आणि दोन चित्रपटगृहे आहेत. परिसरात मोठय़ा प्रमाणावर वाहतूक सुरू असते आणि वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्याचा फटका पादचाऱ्यांनाही बसतो. ही बाब लक्षात घेत पालिकेने ४५ फुटांच्या संत ज्ञानेश्वर मार्गाचे ६० फुटांपर्यंत रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. रस्ता रुंदीकरणाचे काम जवळपास पूर्णही झाले आहे.
संत ज्ञानेश्वर मार्गाच्या रुंदीकरणासाठी जंक्शनवरील के. व्ही. सत्यमूर्ती यांच्या सत्यमूर्ती रेसिडन्सी आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्याच्या आवारातील काही जागेची आवश्यकता असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यासाठी या दोघांनाही नोटीस पाठविण्यात आली होती. नोटीस मिळताच के. व्ही. सत्यमूर्ती यांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयानेही स्थगिती आदेश न दिल्यामुळे आता पालिकेने सत्यमूर्ती रेसिडन्सीच्या आवारातील जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या एक-दोन दिवसांमध्ये या सात मजली इमारतीची संरक्षक भिंत पाडण्याची आणि आवश्यक तेवढी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
काही वर्षांपूर्वी सत्यमूर्ती रेसिडन्सीच्या जागी बंगला होता. या बंगल्याचा पुनर्विकास करताना रस्त्यासाठी जागा सोडण्याची अट घालण्यात आली होती. त्या बदल्यात चटईक्षेत्राच्या रूपात सत्यमूर्ती रेसिडन्सीसाठी लाभही देण्यात आला होता. आता सात मजली इमारत उभी राहिली, मात्र रस्त्यासाठी जागा हस्तांतरित करण्यात आलेली नाही. त्यामुळे या इमारतीला निवासी दाखलाही मिळू शकलेला नाही. ही इमारत जंक्शन परिसरात आहे. रस्ता ६० फूट रुंद करण्यात आला असला, तरी जंक्शनवर थोडी अधिक जागा लागते. त्यामुळे सत्यमूर्ती रेसिडन्सीच्या आवारातील जागेची आवश्यकता आहे, असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
रस्ता रुंदीकरणासाठी ‘प्रतीक्षा’ बंगल्याच्या आवारातील पाच ते सहा फूट जागा मिळावी म्हणून काही दिवसांपूर्वी पालिकेने अमिताभ बच्चन यांनाही नोटीस पाठविली आहे. मात्र या नोटीसचे उत्तर पालिकेला अद्याप पाठविण्यात आलेले नाही, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
रस्ता विस्तारासाठी जागा मिळावी यासाठी सत्यमूर्ती रेसिडन्सीला नोटीस देण्यात आली होती. या नोटीसच्या विरोधात संबंधितांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने स्थगिती आदेश न दिल्यामुळे आता रस्त्याच्या रुंदीकरणासाठी हवी असलेली जागा ताब्यात घेण्यात येईल. – प्रशांत गायकवाड, साहाय्यक आयुक्त, ‘के-पश्चिम’ विभाग