मुंबई महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत असलेल्या आशा व आरोग्य सेविका यांनी ११ जूनपासून बेमुदत आंदोलन पुकारले. मात्र शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांसाठी लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेमुळे आशा व आरोग्य सेविकांनी टप्प्याटप्याने आंदोलन सुरू ठेवले आहे. मात्र, त्याचा परिणाम महानगरपालिकेच्या आरोग्य सेवांवर होताना दिसत आहे. आशा सेविका व आरोग्य सेविका या मुंबई महानगरपालिकेकडून वस्ती पातळीवर पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेचा कणा समजल्या जातात. घरोघरी आरोग्य उपक्रम राबविण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

हेही वाचा >>> सात महिन्याच्या बाळाने गिळल्या तीन चाव्या, राजावाडी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी वाचविले बाळाचे प्राण…

आशा आणि आरोग्य सेविका या लहान मुलांचे लसीकरण, ज्येष्ठ नागरिकांची रक्तदाब व मधुमेह यांची तपासणी, गर्भवती महिलांचे लसीकरण यांसह त्यांना औषधे पुरवणे, त्यांच्यासाठी असलेल्या योजना, नवजात अर्भकांची नोंदणी अशी कामे पार पाडत असतात. मात्र मागील महिन्यापासून आशा व आरोग्य सेविकांनी पुकारलेल्या आंदोलनाचा परिणाम महानगरपालिकेच्या या विविध आरोग्य सेवांवर होत आहे. त्याचप्रमाणे क्षयरोगाला प्रतिबंध करण्यासाठी आयसीएमआर आणि राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन प्रकल्पांतर्गत क्षयरोगग्रस्तांचे बीसीजी लसीकरण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार मुंबईत मार्चपासून १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांचे आशा व आरोग्य सेविकांच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू केले. मात्र या आंदोलनामुळे सर्वेक्षणाचे काम बाधित झाले आहे. तसेच पावसाळ्यातील आजारांबाबत करण्यात येणाऱ्या तपासण्या, साथीच्या आजारांबाबत जनजागृती करणे, ताप आलेल्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना रुग्णालयात आणणे या सेवा आंदोलनामुळे बाधित झाले असल्याचे महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटना आणि म्युनिसिपल आशा सेविका युनियनचे अध्यक्ष ॲड. प्रकाश देवदास यांनी सांगितले.

Story img Loader