गेली अनेक वर्षे मुंबईतील वाहनतळांवरील कंत्राटदारांची मक्तेदारी मोडीत काढण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून वाहनतळांच्या ठेक्याच्या नियमावलीत बदल करून नवी पद्धती अमलात आणण्यात येणार आहे. येत्या १ मे रोजी वाहनतळाचे कंत्राट महिला बचत गट आणि बेरोजगार तरुणांना देण्याचा प्रयत्न पालिका करणार आहे. तसेच वाहनतळांवर ‘वेब पार्किंग’द्वारे शुल्क वसूल करण्यात येणार आहे.
महिला बचत गट आणि बेरोजगार तरुणांना वाहनतळांचा ठेका देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर याविरोधात काही ठेकेदारांनी न्यायालयात धाव घेतली होती. महिला वाहनतळांची देखभाल करू शकणार नाहीत, असा युक्तिवाद ठेकेदारांकडून करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला.
न्यायालयाने याप्रकरणी अद्याप निकाल दिलेला नाही. न्यायालयाचा निकाल जाहीर होताच तातडीने कारवाई करून वाहनतळांचे ५० टक्के काम महिला बचत गटाला, २५ टक्के काम बेरोजगार तरुणांना देण्यात येईल. तसेच उर्वरित २५ टक्के काम खुल्या वर्गातील इच्छुकांना दिली जातील, असे अतिरिक्त आयुक्त असीम गुप्ता यांनी सांगितले.
कंत्राटदारांची मुदत संपुष्टात आल्यामुळे मुंबईतील अनेक ठिकाणचे वाहनतळ महापालिकेने आपल्या ताब्यात घेतले आहेत. यांपैकी ४७ वाहनतळांवर ‘वेब पार्किंग’ पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. या वाहनतळांवर ‘हॅण्ड डिव्हाइस’द्वारे वाहनशुल्काची वसुली करण्यात येत आहे. येत्या १ मेपासून ९२ वाहनतळांवर ‘वेब पार्किंग’ पद्धतीची अंमलबजावणी करण्यात येईल, असे सांगून ते म्हणाले की, न्यायालयाचा निकाल मेपूर्वी अपेक्षित आहे. त्यानंतर तात्काळ निविदा काढून ही कामे महिला बचत गट आणि बेरोजगार तरुणांना दिली जातील. तसेच वाहनतळांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार असून त्यासाठीही निविदा काढण्यात येतील, असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा