रिलायन्सच्या कामांमुळे वारंवार पालिकेला फटका बसत असून मुंबईतील रिलायन्सची कामे तात्काळ बंद करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी बुधवारी प्रशासनाला दिले. जोपर्यंत पालिकेच्या मालमत्तांचे नुकसान होणार नाही याची हमी रिलायन्सकडून मिळत नाही, तोपर्यंत कामे सुरू करू देऊ नका, असेही शेवाळे यांनी स्पष्ट केले.
दादरमधील गोखले मार्ग (उत्तर) येथे तीन, तर आगारबाजारात दोन ठिकाणी रिलायन्सतर्फे खोदकाम काम करण्यात येत आहे. हे खोदकाम सुरू असताना मंगळवारी गोखले मार्गावर (उत्तर) जलवाहिनी फुटली आणि त्यातून ४७ हजार लिटर पाणी वाया गेले. पालिकेच्या जलविभागातील अधिकारी-कर्मचारी निवडणुकीच्या कामांसाठी गेल्याने तात्काळ घटनास्थळी कुणीच येऊ शकले नाही, अशी तक्रार मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली.
जलवाहिनी फुटल्याचे पाहून आपणही पालिकेच्या विभाग कार्यालयशी संपर्क साधला होता. परंतु अधिकारी निवडणुकीच्या कामाला गेल्याचे सांगण्यात आले. पाणीपुरवठा बंद केला असता तरी पाण्याचा अपव्यय टळला असता, असा तक्रारीचा सूर शिवसेना नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांनी आळवला. रिलायन्सच्या कामामुळे महापालिकेला अनेक वेळा फटका बसला आहे.
आतापर्यंत पालिकेने रिलायन्सवर किती दंड ठोठावला आणि त्यापैकी किती रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा झाली याची माहिती द्यावी, अशी मागणी काँग्रेस नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी यावेळी केली. खोदकामाबाबत संपूर्ण मुंबईत एकच धोरण राबवावे, अशी मागणी भाजप नगरसेवक मनोज कोटक यांनी यावेळी केली.
परवानगी न घेताच खोदकाम करणाऱ्या रिलायन्सकडून आतापर्यंत किती दंड वसूल करण्यात आला याची माहिती सादर करावी, असे काँग्रेस नगरसेविका शीतल म्हात्रे म्हणाल्या.
जमिनीखालील सेवा उपयोगिता वाहिन्यांचा आढावा घेतल्यानंतर संबंधित कंपन्यांना खोदकामासाठी परवानगी दिली जाते. मात्र या प्रकरणात असा आढावा न घेताच परवानगी दिली असेल तर त्याबाबत सहाय्यक आयुक्तांकडे चौकशी करण्यात येईल, तसेच रिलायन्सच्या कामामुळे जलवाहिनी फुटली असेल, तर कंपनीवर तात्काळ दंड आकारून तो वसूल केला जाईल, असे अतिरिक्त आयुक्त मोहन अडतांनी यांनी स्पष्ट केले.
रिलायन्सची खोदकामे बंद करा!
रिलायन्सच्या कामांमुळे वारंवार पालिकेला फटका बसत असून मुंबईतील रिलायन्सची कामे तात्काळ बंद करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी बुधवारी प्रशासनाला दिले.
First published on: 13-03-2014 at 12:07 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc standing committee chairman order to close reliance digging work