मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींची विक्री आणि विसर्जनावर उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. महानगरपालिका प्रशासनाने न्यायालयाचे आदेश लक्षात घेऊन गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्यास गणेश मंडपांना प्रतिबंध केला. त्यामुळे अनेक गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्ती पुन्हा माघारी मंडपात आणून झाकून ठेवल्या. मंडपात आणलेल्या गणेशमूर्तींचे पुढे काय करणार, याबाबत मंडळांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी असतानाही दरवर्षी हजारो गणेश मंडपांतर्फे पीओपीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येते. पर्यावरणाला घातक असतानाही अनेकजण घरातही पीओपीच्या गणेशमूर्ती आणतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र, या प्रकरणाची गंभीर दखल घेत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या १२ मे २०२० रोजीच्या सुधारित मार्गदर्शक तत्वांनुसार पीओपी मूर्तींवरील बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला दिले. तसेच पीओपीच्या गणेशमूर्तींची विक्री आणि विसर्जनास प्रतिबंध करण्याचे आदेश न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. सध्या माघी गणेशोत्सव सुरू असून अनेकांनी घरी, तसेच सार्वजनिक मंडळांनी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. मात्र महापालिकेने न्यायालयाचे आदेश लक्षात घेऊन पीओपीच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनास प्रतिबंध केला आहे. त्यामुळे बोरिवली आणि कांदिवलीतीत अनेक गणेशोत्सव मंडळांना पीओपीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करता आलेले नाही.

काही भाविकांनी गोराई येथे पीओपीच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी आणल्या होत्या. मात्र महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशांचे स्मरण करून दिल्यानंतर भाविकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन न करताच त्या परत नेल्या. तसेच पश्चिम उपनगरांतील कांदिवली आणि आसपासच्या परिसरातील काही मंडळांनी सातव्या दिवशी शुक्रवारी गणेश विसर्जन मिरवणुका काढल्या होत्या. विसनस्थळी असलेला कडेकोट बंदोबस्त आणि न्यायालयाचे आदेश लक्षात घेऊन मंडळांनी विसर्जन न करताच गणेशमूर्ती पुन्हा मंडपात नेल्या आणि झाकून ठेवल्या. दरम्यान, चारकोपचा राजा सार्वजनिक गणेश मंडळासह अन्य काही मंडळांच्या गणेशमूर्ती विसर्जनाविना पुन्हा थेट मंडपात नेण्यात आल्या.