मलनिस्सारण वाहिन्यांतील पाणी जलवाहिन्यांमध्ये मिसळल्यामुळे मुंबईचे पाणी दूषित झाले असून अनेक भागांत गंभीर आजारांची साथ पसरत आहे. दूषित पाणीपुरवठय़ाला कारणीभूत ठरलेल्या जलवाहिन्या बदलण्यासाठी पालिकेने हाती घेतलेल्या ‘सुजल मुंबई’ योजनेवर कोटय़वधींचा खर्च करूनही या स्थितीत फारसा बदल झालेला नाही.
ब्रिटिशकालीन जलवाहिन्या जीर्ण झाल्यामुळे पाण्याची गळती आणि दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा निष्कर्ष पालिकेने काही वर्षांपूर्वी काढला होता. त्यामुळे ‘सुजल मुंबई’ योजना आखून जलवाहिन्या बदलण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली होती. त्यासाठी पालिकेच्या विभागांमध्ये २०-२० तत्वावर (२० कोटी) कामे देण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. परंतु त्यावर राजकारण्यांची टीकास्र सोडताच काही फेरबदल करून ही कामे सुरू केली. ५०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च केल्यानंतरही पालिकेला जलवाहिन्यांतून होणारी गळती आणि दूषित पाणीपुरवठय़ाचा प्रश्न सोडविता आला नाही. जुनी झालेली तानसा मुख्य जलवाहिनी बदलण्याचे १५ टक्के कामही अद्याप बाकी आहे. जलवाहिन्यांच्या जाळ्यांचे मॅनिंग मॉपिंग करुन त्याचा आराखडा तयार करण्याचा पालिकेचा मानस होता. परंतु कालौघात ही योजनाही थंडावली. त्यापाठोपाठ जीपीएस (ग्राऊंड पोझिशनिंग सिस्टिम)द्वारे जुन्या जलवाहिन्यांचा आढावा घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. परंतु जीपीएसही केवळ कागदावरच राहिले. त्यामुळे आजही मुंबईतील काही भागात दूषित पाणीपुरवठा होत असून साथीच्या आजारांमुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.