साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून घरोघरी पायपीट करुनही वस्त्यांमधील रहिवाशांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने पालिका अधिकारी हैराण झाले आहेत. परिणामी, मुस्लीम बहुल वस्त्यांमधील रहिवाशांना पालिकेने मौलवींच्या मदतीने आरोग्यविषयक साक्षरतेचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. मौलवींनीही पुढाकार घेत वस्त्यांमध्ये स्वच्छतेचे धडे द्यायला सुरुवात केली आहे.
मुंबईमध्ये अनेक ठिकाणी दाटीवाटीने वस्त्या उभ्या आहेत. छोटय़ा-छोटय़ा गल्लीबोळातून या वस्त्यांमध्ये फिरावे लागते. अस्वच्छता या वस्त्यांच्या पाचवीलाच पुजलेली आहे. कचरा टाकण्याची व्यवस्था नसल्याने तो घरातूनच नाल्याच्या दिशेला अथवा आसपास भिरकावला जातो.
बहुसंख्य वस्त्या नाल्याच्या अथवा नदीच्या कडेला आहेत. त्यामुळे वस्त्यांमधील सांडपाणी नदी-नाल्यात सोडून दिले जाते. यामुळे या वस्त्यांना बकाल रुप आले आहे. दरुगधीचे साम्राज्य पसरलेल्या या वस्त्यांमधील रहिवाशांच्या आरोग्याचे प्रश्न अधूनमधून उद्भवत असतात.
दरवर्षी पावसाळ्यात या वस्त्या पालिकेसाठी डोकेदुखी बनलेल्या असतात. छोटय़ा-छोटय़ा गल्लीबोळांमुळे वस्तीमध्ये जाऊन कीटकनाशक, धूम्रफवारणी करणे अवघड बनते.
साचणाऱ्या पाण्याचा निचरा वेळीत होत नसल्याने या वस्त्यांमध्ये अनेक ठिकाणी डासांची उत्पत्तीस्थाने निर्माण होतात.
त्यामुळे डासांचा मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव होतो आणि वस्त्यांमध्ये साथीचे आजार डोके वर काढतात. अनेक वेळा पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी मोठय़ा धाडसाने या वस्त्यांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी जातात. परंतु त्यांना रहिवाशांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही.
रहिवाशांचा प्रतिसाद न लाभल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांना हात हलवत माघारी फिरावे लागते. त्यामुळे मौलवींची मदत घेतली जात आहे. ही जनजागृती मोहीम यशस्वी झाल्यास या वस्त्यांना आलेले बकाल रुप लवकरच दूर होण्याची शक्यता आहे.

मौलवींचाही पुढाकार
महापालिकेच्या या स्वच्छतेच्या मोहिमेत मौलवींची मदत घेताना मौलवींनीही चांगले सहकार्य केले असून काही ठिकाणी मौलवी या स्वच्छतेसाठी स्वत:हून पुढाकार घेत आहेत. स्वच्छता कशी राखावी, कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी, साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी, ताप आल्यास घरी स्वत:च उपचार करण्याऐवजी डॉक्टरकडे जावे, परिसरात कीटकनाशक, धूम्रफवारणी करुन घ्यावी, त्यासाठी तक्रार कुठे करावी, याबाबतची माहिती पालिकेकडून मौलवींना देण्यात आली आहे. नमाज पढण्यासाठी मशिदीमध्ये येणाऱ्या मुस्लीम बांधवांना वस्त्यांमध्ये स्वच्छता राखण्याबाबत मौलवी मार्गदर्शन करीत आहेत. मौलवींच्या मदतीमुळे स्वच्छता राखण्याचा मंत्र मुस्लीम बहुल वस्त्यांमध्ये देण्यात येत आहे. त्यामुळे साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यास पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना मदत होत आहे.

Story img Loader