मुंबई : प्रसिद्ध हास्य कलाकार कुणाल कामरा याने खार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कविता सादर केल्यानंतर संबंधित हॉटेल अनधिकृत असल्याचे आरोप झाले. परिणामी, महापालिकेने संबंधित हॉटेलमध्ये पाहणी केल्यानंतर आरोपांमध्ये तथ्य असल्याचे निदर्शनास येताच अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई केली. कारवाईत हॉटेलसमोरील शेड आणि तळघरातील अनधिकृत बांधकाम हटवून परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात आला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक कवितेमुळे शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. कुणाल कमारा याने युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील ज्या स्टुडिओमध्ये कवितेचे सादरीकरण केले, त्याची कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. त्यांनतर अनेक राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या. आरोप प्रत्यारोप होऊ लागले. दरम्यान, युनिकॉन्टिनेंटल हॉटेलही चर्चेत आले आणि तिथे अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचे आरोप होऊ लागले.

यापूर्वीही संबंधित हॉटेल आणि तेथील स्टुडिओ अनधिकृत तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी संबंधित हॉटेलची पाहणी केली. पाहणीअंती हॉटेलमध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पालिकेने हॉटेलसमोरील शेड हटवली. तसेच, हॉटेलच्या तळघरातील स्टुडिओचीही पाहणी केली. त्यातही हॉटेलमार्फत अवैध बांधकाम करण्यात आले होते. त्यामुळे महापालिकेने तेथील २१.७९ मीटर लांब, ७.५ मीटर रुंद आणि २.८ मीटर उंचीचे बांधकाम हटवून जागा अतिक्रमणमुक्त केली.

त्यावेळी संबंधित पालिका विभाग कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. तसेच, पोलिसांच्या देखरेखीखाली कारवाई करण्यात आली. दरम्यान, संबंधित हॉटेलच्या इमारतीतील मुख्य संरचनेची पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या तपासणीत समोर येणाऱ्या निष्कर्षानुसार हॉटेलवर कारवाई करण्यात येणार आहे.