संदीप आचार्य
महाराष्ट्राच्या ग्रामीण आरोग्याचा भार हा प्रामुख्याने गावखेड्यात काम करणाऱ्या आशा सेविकांवर अवलंबून असतो. त्यांच्याच माध्यमातून राज्याचा आरोग्य विभाग गर्भवती महिला व बालकांचे आरोग्य जपणूक, करोनासह विविध साथींचा आढावा घेण्याचे काम तसेच वृद्धांचे आरोग्य, मानसिक आणि अन्य आजारांशी निगडीत विविध विषय हाताळणे, मार्गदर्शन, माहिती गोळा करणे आणि रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत करण्याची कामे करत असते. आशांचे हे महत्त्व ओळखून मुंबई महापालिकेनेही प्रामुख्याने झोपडपट्टी विभागात आरोग्याच्या कामांसाठी ५,५०० आशा सेविकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे या आशांना केंद्र शासनाच्या निकषांप्रमाणे मानधन दिले जाते. मात्र महानगरपालिकेने केंद्र शासनाच्या निकषांच्या पलिकडे जाऊन या आशा सेविकांना १० ते १२ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यामध्ये आरोग्य विभागाच्या अखत्यारित सुमारे साठ हजार आशा सेविका काम करीत असून प्रामुख्याने राज्याच्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या या आशा सेविकांना जवळपास ७२ प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात येतात. मात्र त्या तुलनेत या आशांना पुरेसे मानधन देण्यात येत नाही. तसेच अत्यधुनिक तंत्रज्ञानासह पुरेशा सोयी-सुविधा देण्यात येत नसल्यामुळे वेळोवेळी या आशांकडून आंदोलने व संप पुकारले जातात. या पार्श्वभूमीवर मुंबईची लोकसंख्या व झोपडपट्टी क्षेत्र वा गरीब क्षेत्रात राहात असलेली लोकसंख्या लक्षात घेता मुंबई महापालिकेमध्ये आशा सेविकांचे प्रमाण अत्यल्प म्हणावे लागेल.
आशा सेविकांना प्रतीकामानुसार मिळणार मानधन
मुंबई महापालिकेत कालपर्यंत आशांची ७२५ पदे मंजूर होती. त्यापैकी ६५८ पदे भरण्यात आली होती. या आशा प्रामुख्याने महापालिकेच्या गरीब वस्तीमधील विविध आरोग्य केंद्रांमध्ये काम करून आरोग्यविषयक आवश्यक ती माहिती गोळा करणे, तसेच रुग्ण मदतीची कामे करत असतात. याशिवाय महापालिकेत कम्युनीटी हेल्थवर्करच्या ३७०० मंजूर पदांपैकी २७७१ पदे भरण्यात आली असून वेगवेगळ्या आरोग्य केंद्रांमध्ये हे कर्मचारी काम करीत असतात. मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील आशा सेविकांच्या माध्यमातून झोपडपट्टी विभागात आरोग्यविषयक जनजागृतीसाठी मासिक सभांचे आयोजन, जन्म-मृत्यूची नोंदणी, पात्र जोडप्यांची यादी, गर्भवती महिलांची यादी तयार करणे, लसीकरणासाठी पात्र बालकांची नोंद, गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व व पश्चात आवश्यक असलेल्या तपासण्यांची नोंद ठेवणे तसेच बालकांचे लसीकरण आदी ३९ प्रकारची आरोग्यविषयक कामे प्राधान्याने करावी लागतात. यासाठी प्रतीकामानुसार त्यांना मानधन देण्यात येत असून महिन्याकाठी त्यांनी केलेल्या कामाच्या बदल्यात साधारणपणे आठ हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न या आशा सेविकांना मिळत असल्याचे पालिका आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
मुंबई: नव्या वर्षात बेस्टचे स्मार्ट मीटर; कशासाठी, किती दिवसात बसविणार स्मार्ट मीटर वाचा…
केंद्र शासनाच्या निकषांनुसार केंद्राच्या माध्यमातून हा निधी मिळतो. यात केंद्राकडून निधी मिळण्यास उशीर झाला तरी महापालिका आशा सेविकांना वेळेवर मानधन देत असल्याचे पालिकेच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.
लोकसंख्येमुळे आरोग्य सेवेवर ताण
करोना काळात मुंबईच्या आरोग्य सेवेचा विस्ताराचे महत्त्व प्रामुख्याने अधोरेखित झाले होते. करोनाकाळात धारावी पॅटर्नचे कौतुक झाले असले तरी प्रामुख्याने झोपडपट्टी परिसर वा गरीब वस्तींमधील लोकसंख्येचा विचार करता आरोग्य सेवेवर येणाऱ्या ताणाचा आढावा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी घेतला. मुंबईतील गरीब वस्तींमधील वाढलेली लोकसंख्या, महिला व लहान मुलांची संख्या आणि त्यांच्या आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात या भागातील आरोग्यविषयक माहिती हाती असणे तसेच या वर्गाला आरोग्यविषयक सेवा योग्यप्रकारे पोहोचविण्याचे महत्त्व अधिक प्रकर्षाने अधोरेखित झाल्यानंतर डॉ. संजीवकुमार यांनी साडेपाच हजार आशा सेविकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
या आशांना मानधन देण्याबाबत केंद्र शासनाचे जे निकष आहेत त्यापेक्षा जास्त मानधन देण्याचा निर्णयही अतिरिक्त आयुक्तांनी घेतला. यानुसार मुंबई महापालिकेच्या अखत्यारित काम करणाऱ्या आशा सेविकांना यापुढे १० ते १२ हजार रुपये मानधन देण्यात येणार असल्याचे डॉ. संजीवकुमार यांनी संगितले. मुंबईसारख्या शहरातील राहणीमानाचा व महागाईचा विचार करून मानधनवाढीचा हा निर्णय घेण्यात आला असून या अतिरिक्त बोजा महापालिकेच्या तिजोरीतून भागविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईत गुरुवारनंतर पुन्हा हुडहुडी; नववर्षात किमान तापमान १४ अंशावर येण्याची शक्यता
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज्यातील तसेच प्रामुख्याने शहरी आरोग्याला प्राधान्य देण्याची भूमिका घेतली आहे. खासकरून मुंबईतील आरोग्यासह महापालिकेशी संबंधित विविध विषयांचा त्यांनी वेळोवेळी आढावा घेऊन आरोग्य सेवा सक्षम करण्यास सांगितल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या आरोग्यविषयक घेतलेल्या स्पष्ट भूमिकेमुळे आरोग्यसेवेचा विस्तार करण्यासह साडेपाच हजार आशा सेविकांच्या नेमणुकीचा निर्णय घेणे शक्य झाल्याचे डॉ. संजीवकुमार यांनी सांगितले. या आशा सेविकांच्या नियुक्तीनंतर प्रामुख्याने मुंबईतील गोरगरीब वस्तीमधील आरोग्याचा चेहरामोहरा बदलून येथील गरजूंना प्रभावी आरोग्य सेवा देता येईल असा विश्वास डॉ. संजीवकुमार यांनी व्यक्त केला.