मुंबई : मुंबई आणि मिरा-भाईंदर या शहरांना जोडणाऱ्या दहिसर-भाईंदर उन्नत जोडरस्ता (डीबीएलआर) प्रकल्पाचा अर्धा खर्च उचलण्यास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा(एमएमआरडीए)ने असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा संपूर्ण साडेतीन हजार कोटींचा खर्च मुंबई महापालिकेला करावा लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दहिसर-भाईंदर उन्नत जोडरस्ता (डीबीएलआर) हा मुंबई पालिकेचा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. पालिकेने या प्रकल्पासाठी १ हजार ९९८ कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चासाठी निविदा प्रक्रिया राबवली. त्यात लार्सन ॲण्ड टुब्रो (एल ॲण्ड टी) कंपनीने सर्वात कमी किमतीची (१,९८१ कोटी रुपये) बोली लावली. त्यामुळे पालिकेने जुलै २०२३ मध्ये ‘एल ॲण्ड टी’ला या प्रकल्पाचे काम दिले. सर्व करांसह या प्रकल्पाचा खर्च ३३०० कोटींवर जाणार आहे.

हेही वाचा >>> मुंबई: एका वर्षात विनातिकीट प्रवाशांना पकडून १०० कोटींची दंडवसुली

या प्रकल्पातील १.५ किमीचा उन्नत मार्ग मुंबई पालिका हद्दीत, तर ३.५ किमी उन्नत मार्ग मिरा-भाईंदर पालिका हद्दीत असणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाची उभारणी मुंबई पालिकेकडून करण्यात येते आहे. मीरा-भाईंदर पालिकेकडे निधी नसल्यामुळे त्यांच्या हद्दीतील प्रकल्पासाठीच्या खर्चाचा परतावा हा ‘एमएमआरडीए’मार्फत मुंबई पालिकेला दिला जाईल, असे प्रकल्पाच्या प्राथमिक बैठकीत ठरले होते. मात्र, मुंबईत ‘एमएमआरडीए’चे अन्य प्रकल्पही सुरू असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होणार असल्याने जोडरस्त्याचा निधी देण्यास ‘एमएमआरडीए’ने असमर्थता दर्शवली आहे. अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या प्रकल्पाचा खर्च मुंबई महापालिका उचलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> मुंबई: अटल सेतूलावरुन महिन्याभरात धावली ८ लाख १३ हजार वाहने,महिन्याभरात केवळ १३ कोटींचा महसूल

४२ महिन्यांत काम होणे अपेक्षित

एकूण ४५ मीटर रुंद आणि पाच किलोमीटर लांब अंतराच्या या दहिसर-भाईंदर जोडरस्त्यासाठीचे बांधकाम हे कमाल ४२ महिन्यांत करणे अपेक्षित आहे. तसेच, प्रकल्प परवानग्यांसाठी सहा महिने अतिरिक्त अंदाजित कालावधीचादेखील समावेश आहे. प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर पुढील तीन वर्षांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ही कंपनीची असेल.

सागरी किनारा रस्त्याचे अंतिम टोक

सध्या पश्चिम उपनगरात दहिसर (पश्चिम) ते भाईंदर (पश्चिम) या भागांत फक्त रेल्वे मार्गाद्वारे जाण्याची व्यवस्था आहे. मात्र, दहिसर-भाईंदर उन्नत जोडरस्त्यामुळे या परिसरातील नागरिकांसाठी आणखी एक पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्प हा पुढे दहिसरला जोडणार असल्यामुळे हा उन्नत मार्ग म्हणजे सागरी किनारा रस्त्याचे अंतिम टोक असेल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc to bear entire cost of rs 3500 crores for dahisar bhayander elevated road project mumbai print news zws