मुंबई म्हटलं की लोकलचा प्रवास ठळकपणे डोळ्यांसमोर येतो. त्यापाठोपाठ मुंबईकरांचा प्रवासात जाणारा वेळ आणि रस्तेमार्गाने जाणाऱ्या मुंबईकरांना ट्रॅफिकमुळे होणारा मनस्तापही नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबईतलं ट्रॅफिक, त्यातही पावसाळ्यात पाणी साचल्याने येणाऱ्या अडचणी, खड्डे अशा सर्व अडथळ्यांची शर्यत पार करत मुंबईकर आधी घरून ऑफिसला आणि नंतर ऑफिसमधून घरी पोहोचतात. पण आता मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. येत्या तीन महिन्यात पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणाऱ्या ट्विन टनेलच्या कामाला सुरुवात होणार आहे!
गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्प
गोरेगाव-मुलुंड लिंक रोड या मुंबई महानगर पालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा हे ‘ट्विन टनेल’ महत्त्वाचा भाग आहेत. एकूण १२.२० किलोमीटरच्या या लिंक रोड प्रकल्पांतर्गत पूर्णपणे भूमिगत असे हे दोन भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहेत. या दोन्ही भुयारी मार्गांची लांबी साधारण ४.७० किलोमीटर इतकी असेल. यात दादासाहेब फाळके चित्रपट नगरी अर्थात फिल्मसिटीच्या १.६ किलोमीटरच्या जोडमार्गाचाही समावेश आहे. गेरोगाव फिल्म सिटी ते मुलुंड खिंडीपाडा या दरम्यान हे ट्विन टनेल बांधले जाणार आहेत.
निविदा प्रक्रिया पूर्ण
या ट्विन टनेलचं बांधकाम करण्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेकडून देण्यात आली आहे. त्यानुसार, जे कुमार-एनसीसी जेव्ही कंपनीला या ट्विन टनेलचं बांधकाम करण्याचं कंत्राट देण्यात आलं आहे. येत्या साडेचार वर्षांमध्ये या भुयारी मार्गांचं काम पूर्ण केलं जाणार आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये, अर्थात तीन महिन्यांत या भुयारी मार्गांच्या कामाला सुरुवात होणार असल्याचं पालिकेकडून जाहीर करण्यात आलं आहे. पालिकेच्या नियोजनानुसार २०२७ साली या भुयारी मार्गांचं काम पूर्ण होईल.