मुंबई : वरळी येथे पालिकेच्या इंजिनिअरींग हबजवळ पालिकेतर्फे भूमिगत बहुमजली वाहनतळ उभारण्यात येणार असून पालिकेने त्याकरीता निविदा मागवल्या आहेत. बहुमजली स्वयंचलित वाहतनतळ तयार करण्यासाठी आराखडा तयार करणे, बांधकाम करणे या कामाकरीता पालिकेने निविदा मागवल्या आहेत. चार वर्षात हे भूमिगत वाहनतळ बांधून पूर्ण करायचे असून त्याकरीता सुमारे २१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
हेही वाचा >>> एमएमआरडीएच्या प्रकल्पातील भूसंपादन प्रक्रिया होणार सोपी; जमीनधारकांना वाजवी मोबदला देण्यासाठी मूल्यांकन समिती
मुंबईतील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वाहनतळेही अपुरी पडू लागली आहेत. कुठेही, कशीही वाहने उभी करून ठेवलेली असल्यामुळे वाहतूक कोंडीही होऊ लागली आहे. वाहनांची संख्या वाढू लागल्यामुळे या वाहनांसाठी वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देणे हे पालिकेपुढील मोठे आव्हान आहे. पालिकेने काही वर्षांपूर्वी महालक्ष्मी येथील भुलाबाई देसाई रोड परिसरात स्वयंचलित बहुमजली वाहनतळ सुरू केले होते. मुंबईतील जागा आता कमी पडू लागल्यामुळे पालिकेने भूमिगत वाहनतळांचा पर्याय पुढे आणला आहे. या अंतर्गत आतापर्यंत मुंबादेवी आणि माटुंगा अशा दोन ठिकाणी भूमिगत बहुमजली वाहनतळ उभारण्यात येणार आहेत.मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकानजिक तसेच मुंबादेवी परिसरात अशा दोन ठिकाणी बहुस्तरीय यांत्रिकी वाहनतळ सुरू करण्याचे ठरवले होते. रोबो अर्थात स्वयंचलिक पार्किंग उभारण्याकरीता कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. ही वाहनतळे पूर्ण झाल्यानंतर माटुंगा येथे ४७५ वाहनांसाठी तर मुंबादेवी येथे ५४६ वाहनांसाठी जागा निर्माण होऊ शकणार आहे.
हेही वाचा >>> प्राधिकरणाच्या कारवाईनंतर झोपडीवासीयांचे थकवलेले १८० कोटींचे भाडे वसूल!
पालिकेच्या मालकीची उद्याने, क्रिडांगणांच्या मोकळ्या जागेत, जमिनीखाली किंवा जमिनीवर अशी वाहनतळे तयार केली जाणार आहेत. याचाच पुढचा भाग म्हणून पालिकेने आता अशीच सुविधा आणखी तीन ठिकाणी देण्याचे ठरवले आहे. वांद्रे पश्चिमेकडे पटवर्धन उद्यान, वरळी इंजिनिअरींग हब आणि हुतात्मा चौकात वाहतूक बेटाजवळ वाहनतळ उभे केले जाणार आहे. त्यापैकी वरळी येथे वाहनतळ उभारण्यासाठी आराखडा तयार करणे, वाहनतळ उभारणे याकरीता पालिकेने निविदा मागवल्या आहेत.
देखभालीचे २० वर्षांचे कंत्राट
वाहनतळाची वार्षिक देखभाल आणि पार्किंगच्या यंत्रणेची सुविधा देणे या कामासाठी कंत्राटदाराला तब्बल २० वर्षांचे कंत्राट देण्यात येणार आहे. तर वाहनतळाचे प्रचालन,साफसफाई याकरीता पाच वर्षांचे कंत्राट दिले जाणार आहे. या वाहनतळांमध्ये शटल व रोबो पार्किंगची सुविधा असेल.