BMC Cleanup Marshal Service Updates : मुंबईतून येत्या काही दिवसातच क्लीनअप मार्शलची सेवा पूर्णतः बंद होणार आहे. गेल्यावर्षी सुरू केलेले कंत्राट बंद येत्या ४ एप्रिलला संपणार असून त्यानंतर हे कंत्राट वाढवण्यात येणार नाही. त्यामुळे मुंबईकरांच्या मनातील क्लीनअप मार्शलची दहशत लवकरच संपणार आहे. क्लीनअप मार्शलबाबतच्या वाढत्या तक्रारींमुळे पालिका प्रशासनामुळे हा निर्णय घेतल्याचे समजते.
रस्त्यावर चालताना एखादा कागद टाकला किंवा थुंकले तरी तत्काळ त्याला पकडण्यासाठी पालिकेने नेमलेले क्लीनअप मार्शल हजर होतात. या क्लीनअप मार्शलमुळे मुंबई स्वच्छ झाली की नाही माहीत नाही पण मुंबईकरांना त्यांचा मोठा उपद्रव सोसावा लागतो. नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याऐवजी हे क्लीनअप मार्शल हुज्जत घालण्यासाठीच जास्त ओळखले जाऊ लागले. अखेर या क्लीन अप मार्शलची सेवा येत्या काही दिवसात बंद करण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
मुंबई महापालिकेने एप्रिल २०२४ मध्ये प्रत्येक प्रशासकीय विभागात ३० क्लीनअप मार्शल याप्रमाणे संपूर्ण मुंबईसाठी मार्शल नेमले आहेत. रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणे, रस्त्यावर स्नान करणे, मलमूत्र विसर्जन करणे अशा प्रत्येक चुकांसाठी हे क्लीनअप मार्शल नागरिकांकडून २०० रुपये ते एक हजार रुपये दंड वसूल करतात व नागरिकांचे प्रबोधनही त्यांनी करावे असे अपेक्षित आहे. वसूल केलेल्या दंडापैकी ५० टक्के रक्कम क्लीनअप मार्शलचा पुरवठा करणाऱ्या संस्थेला तर ५० टक्के रक्कम पालिकेला मिळते.
दरम्यान, घनकचरा व्यवस्थापन विभागाची नवीन नियमावली तयार होत असून ती नियमावली तयार झाल्यानंतर विविध प्रकारच्या दंडाच्या रकमेतही बदल होणार आहेत. त्यामुळे ही सेवा बंद करण्यात आल्याचे घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
वाढत्या तक्रारी ….
रुग्णालयात कारवाईच्या नावाखाली क्लीनअप मार्शल रुग्णांच्या नातेवाईकांची लूट करत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या. त्यामुळे महापालिकेची प्रतिमा मलिन होत असल्याने रूग्णालयातील क्लीनअप मार्शलची सेवा बंद करण्यात आली होती. तसेच इतर ठिकाणीसुद्धा क्लीनअप मार्शल अनधिकृत बांधकामांच्याठिकाणी जाऊन पैसे उकळत असल्याचा तक्रारी आल्या होत्या. त्यामुळेही ही सेवा बंदच करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
क्लीन अप मार्शलवर यापूर्वी कारवाई …
गेल्या काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने क्लीन अप मार्शल सेवा पुरवठादार संस्थांच्याविरोधात बडगा उचलला होता. पालिकेच्या सहा रुग्णालयांमधील क्लीनअप मार्शलची सेवा काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आली होती. दरम्यान, गेल्या महिन्यात क्लीनअप मार्शल संस्थाना मुंबई महापालिका प्रशासनाने दंड केला होता. क्लीनअप मार्शलनी कामात कुचराई केल्याबद्दल अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी पालिका मुख्यालयात झालेल्या एका बैठकीत क्लीनअप मार्शल संस्थांची झाडाझडती घेतली. कामात कसूर करणाऱ्या क्लीनअप मार्शल संस्थांना पालिका प्रशासनाने दंड लावला. बारापैकी सात कंत्राटदारांना दंड लावण्यात आला असून एकूण सुमारे ६५ लाख दंड लावण्यात आला आहे. त्यानंतर मार्च महिन्यात पालिका प्रशासनाने सहा रुग्णालयाततून क्लीनअप मार्शल हद्दपार केले होते.