मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील सफाई कामगारांच्या हजेरी चौकीमध्ये सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्रे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घनकचरा विभागात सुमारे सहा हजार महिला कामगार असून पहाटे साडेसहा वाजता त्या कामावर येतात. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा >>> मुंबई हादरली! लोअर परळमध्ये १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, आरोपींमधील तिघे अल्पवयीन
मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात एकूण २८ हजार ०१७ कामगार आहेत. त्यामध्ये सुमारे सहा हजार महिला कामगार आहेत. महिला कामगारांना पुरुषाप्रमाणेच काम करावे लागते, कचरा उचलावा लागतो. बहुतांश सफाईचे काम हे सकाळच्या पाळीत होत असते. त्यामुळे सफाई कामगारांना पहाटे साडेसहा वाजता आपल्या हजेरी चौकीवर उपस्थित राहावे लागते. कामाच्या वेळी महिला कामगारांना सॅनिटरी नॅपकिन बदलण्याची वेळ आल्यास त्याची विल्हेवाट लावणे कठीण होते. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी प्रत्येक चौकीत सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावणारे यंत्र (सॅनिटरी नॅपकिन इन्सिनेटर) बसवण्यात येणार आहे. प्रतिदिन १०० नॅपकिनची विल्हेवाट लावण्याची क्षमता या यंत्राची आहे. या यंत्राकरिता विद्युतपुरवठ्याची आवश्यकता असून चौकीमध्ये योग्य ठिकाणी हे यंत्र बसविण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> ‘मेट्रो २ बी’ उन्नत मार्गाला उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील; विमान उड्डाणातील संभाव्य धोके लक्षात घेऊनच बांधकामाला परवानगी
महानगरपालिकेने अशी २४० यंत्रे बसवण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. त्यात ४०,३९२ रुपये दराने यंत्र पुरवठा व देखभाल या कामासाठी कंत्राटदार निश्चित करण्यात आला आहे. एक वर्ष हमी कालावधी व दोन वर्षे परीक्षण खर्च असे मिळून १ कोटी २८ लाख ४४ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत.