मुंबई : मुंबईतील वाहनतळांचे सुयोग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी महापालिका मोबाइल अ‍ॅप तयार करणार असून त्याला अखेर मुहूर्त मिळाला आहे. वाहन उभे करण्यासाठी लवकरच ऑनलाइन पद्धतीने वाहनतळावर आरक्षण करता येणार आहे. या कामासाठी पालिकेने सल्लागाराची नियुक्ती केली आहे. या सुविधेमुळे मुंबईकरांना एखाद्या ठिकाणी पोहोचण्याआधीच वाहनासाठी जागा आरक्षित करता येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई महानगरपालिकेने वाहनतळ प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा केली होती. तसेच वाहनतळाच्या व्यवस्थापनासाठी मोबाइल अ‍ॅप आणण्याचेही ठरवले होते. त्याला आता गती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात महानगरपालिका आणि इतर शासकीय संस्था म्हणजे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पोर्ट ट्रस्ट, रस्त्यालगतची वाहनतळे आणि खासगी गृहनिर्माण संस्थांमध्ये पार्किंगसाठी उपलब्ध असलेल्या जागा अशी सर्वच माहिती एकाच सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहनतळ शोधणे, जागा आरक्षित करणे सोपे होणार आहेच, पण  वाहनतळ संचलन, उपलब्ध वाहनतळ जागांचा पुरेपूर वापर करण्यासह एकूणच रस्त्यांवरील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे.

सुविधेचे फायदे

या सुविधेचा वापर करून वापरकर्त्यांना ‘डिजिटल’ व ‘कॉन्टॅक्टलेस पेमेंट’ करता येते.  काही क्षणांत हा व्यवहार करणे शक्य आहे. वाहनांच्या ‘लायसन्स नंबर प्लेट’शी हे  व्यवहार संलग्न असणार आहेत.  त्या वाहनाशी संबंधित व्यवहार पूर्ण झाला आहे की नाही याची पडताळणी करण्यात येईल. नियमितपणे या वाहने उभी करण्याच्या सुविधेचा वापर करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी वाहनाशी संलग्न अशा मोबाइल क्रमांकाचा वापर करून शुल्क अदा करता येईल. महत्त्वाचे म्हणजे हे डिजिटल व्यवहार कुठूनही करता येतील. त्यासोबतच फास्टटॅग सुविधा संपूर्ण डिजिटल व्यवहारासाठी संलग्न असणार आहे. यामुळे इंधन आणि वेळेची बचतही होणार आहे.

या प्रकल्पांतर्गत चार टप्प्यांत  वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र पहिल्या टप्प्यात रस्त्यावरील वाहनतळाव्यतिरिक्त जागांचा समावेश असेल.   पालिकेच्या १७ विभागांमधील ३२ ठिकाणचे सार्वजनिक वाहनतळ आणि २९ ठिकाणचे सुविधा वाहनतळ यांचा त्यात समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात सध्याच्या ६५ ठिकाणांवरील रस्त्यालगतच्या प्रस्तावित ५३० ठिकाणांचा समावेश असेल. 

वाहतूक व्यवस्थेचे चित्र बदलणार

या ‘सॉफ्टवेअर’मुळे वाहनतळ सुविधेशी सर्व संबंधित बाबी एकत्रित करणे शक्य होईल. या सुविधेमुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेचे एकूणच चित्र बदलणार असल्याचा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मुंबईकरांना २४ तास पार्किंगशी संबंधित माहिती मोबाइल व इतर उपकरणांचा उपलब्ध होणार आहे. परदेशात ज्या पद्धतीने एखाद्या ठिकाणी पोहचण्याआधीच आपला आरक्षण करता येतो, रक्कम अदा करता येते, त्याच धर्तीवर अगदी सहज ऑनलाइन पद्धतीने कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय ही सुविधा मुंबईकरांना सुलभरीत्या वापरासाठी उपलब्ध होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासु यांनी दिली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc to launch app for online parking reservation facility mumbai print news zws