मुंबई : मुंबईची प्रतिमा उंचावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या मुंबई सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत संपूर्ण मुंबईत दिव्यांचा लखलखाट करण्याचे ठरवले आहे. रस्ते, पूल, आकाशमार्गिका, समुद्र किनारे याठिकाणी दिव्यांचा कायमस्वरूपी लखलखाट करण्यात येणार आहे. त्यासाठी १७२९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> “मी बाळासाहेब ठाकरेंविरोधात अब्रू नुकसानीचा खटला केला, कारण…”; छगन भुजबळांनी सांगितला ‘तो’ किस्सा

मुंबई सुशोभिकरण प्रकल्प आराखड्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यानंतर पालिकेने आता त्याच्या नियोजनाची तयारी सुरू केली आहे. या प्रकल्पांतर्गत रस्ते, पूल, पदपथ, वाहतूक बेटे, समुद्रकिनारे, उद्याने इत्यादी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, सुधारणा, आकर्षक प्रकाशयोजना अशी कामे केली जाणार आहेत. डिसेंबर २०२२ पर्यंत किमान ५० टक्के कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. १६ विविध प्रकारची कामे या प्रकल्पांतर्गत केली जाणार आहेत. त्यात सुविधा शौचालय, मियावाकी वृक्ष लागवड, गेट वे ऑफ इंडिया परिसराचे सुशोभिकरण, वाहतूक बेटांचे सुशोभिकरण अशा कामांबरोबरच रोषणाईवर सर्वाधिक भर दिला जाणार आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : ऋतुजा लटके प्रकरणी पेच काय होता? शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना निवडणूक लढवता येते का?

हा एकूण प्रकल्प १७२९ कोटींचा आहे. त्यापैकी ९३९ कोटी रुपयांचा निधी विभाग स्तरावर दिला जाणार आहे तर रस्ते, पूल, उद्यान कक्ष अशा मध्यवर्ती यंत्रणा स्तरावर ७९० कोटींचा खर्च दिला जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली. या सर्व कामांपैकी ५० टक्के कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट्य निश्चित करण्यात आले आहे. सर्व कामे पूर्ण करण्यासाठी मार्च २०२३ ची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, बहुतांशी कामे रोषणाई संबंधी असून काही कामे ही विभाग स्तरावरील आहेत. त्यामुळे ही कामे मुदतीत पूर्ण होतील, असेही ते म्हणाले.

सुशोभिकरणाच्या कामांमध्ये रोषणाईवर अधिक भर दिला जाणार आहे. उड्डाणपूल, आकाशमार्गिकांवरील अंधार दूर करणारे विशेष दिवे बसवले जाणार आहेत. तसेच वाहतूक बेटे, रस्ते, पदपथांवर रात्रीच्यावेळी चांगला उजेड असेल याची खबरदारी घेतली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच समुद्र किनाऱ्यांवर होलोग्राम, लेझर रोषणाई करण्यात येणार असल्याचे संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोणत्या कामासाठी किती खर्च

पदपथांची सुधारणा……. ६० कोटी

आकाशमार्गिकांवरील दिवे…. ४० कोटी

समुद्र किनाऱ्यांवर रोषणाई …. २५ कोटी

उद्यानांचे सुशोभिकरण व दिवे ….. १५ कोटी

जाहिरातीसाठी डिजीटल फलक …. १० कोटी

किल्ल्यांची रोषणाई … २५ कोटी

गेट वे ऑफ इंडियाचे सुशोभिकरण ….२० कोटी

मियावाकी वृक्षलागवड … .२ कोटी

स्वच्छतेसाठी यांत्रिक उपकरणे …. .१५ कोटी

सुविधा शौचालयांची निर्मिती ……….७८ कोटी

एकूण ………. २९० कोटी

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc to spend 1729 crore for street lamps on beach under mumbai beautification project mumbai print news zws