मुंबईसारख्या प्रगत शहरातील सुशिक्षित नागरिकांचे नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी मंगळवारी लोकशाहीलाच लाज आणली. महालक्ष्मी रेसकोर्ससंबंधी चर्चेची मागणी धुडकावल्याने नाराज विरोधकांनी महापौरांना बांगडय़ांचा अहेर देताच शिवसेना नगरसेविकांनी काँग्रेसच्या नगरसेविकेवर हल्ला करून मारहाण केली.  
मुंबईमधील धोकादायक इमारतींवर चर्चा करण्यासाठी पालिका सभागृहाची विशेष बैठक मंगळवारी भरविण्यात आली होती. यावर चर्चा सुरू असतानाच सत्ताधारी पक्षाच्या वतीने महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेचा मुद्दा मांडण्यात आला. टर्फ क्लबचा भाडेपट्टा संपुष्टात आल्याने रेसकोर्सची जागा ताब्यात घेऊन त्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान विकसित करण्याबाबत स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांची सूचना महापौरांनी पुकारताच विरोधकांनी चर्चेची मागणी केली. मात्र महापौरांनी चर्चेस नकार देत ही ठरावाची सूचना मंजूर केली. यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांनी शिवसेना व महापौरांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली.
हा गोंधळ सुरू असतानाच काँग्रेस नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी महापौरांच्या आसनाजवळ जाऊन त्यांच्या मेजावर बांगडय़ा फेकल्या. हा प्रकार पाहून संतापलेल्या शिवसेना नगरसेविका यामिनी जाधव, किशोरी पेडणेकर यांच्यासह आठ-दहा नगरसेविकांनी शीतल म्हात्रे यांच्यावर हल्ला चढविला. शीतल म्हात्रे यांच्या शेजारी असलेल्या राष्ट्रवादीच्या संध्या जोशी यांनाही मारहाण झाली. सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी मध्यस्थी करीत त्यांना दूर केले. त्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.
सभागृहातून बाहेर पडलेल्या विरोधकांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांची भेट घेऊन संरक्षण देण्याची मागणी केली. त्यानंतर विरोधकांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात यामिनी जाधव आणि किशोरी पेडणेकर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यापाठोपाठ सत्ताधारी नगरसेविकांनीही शीतल म्हात्रे यांच्याविरुद्ध तक्रार नोंदविली.

लोकशाहीला काळीमा
काँग्रेस नगरसेविकेने बांगडय़ांचा आहेर देऊन लोकशाहीला काळीमा फासला. त्यामुळे कायद्यानुसार त्यांना योग्य ते शासन केले जाईल.
– महापौर सुनील प्रभू

अभ्यास करून निर्णय
सभागृह चालविण्याचा अधिकार महापौरांचा आहे. मात्र या प्रकाराबाबत कायद्यात कोणती तरतूद आहे याचा अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल.
– पालिका आयुक्त सीताराम कुंटे

जबाबदारी आयुक्तांची
सत्ताधारी नगरसेवकांकडून विरोधकांना धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विरोधकांच्या संरक्षणाची जबाबदारी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांची आहे.
– विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम