मुंबई महानगरपालिका सभागृहाने मंजूर केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्याची मागणी
शाळेतील मुलांना खेळण्याच्या व अभ्यासाच्या नादात पाणी पिण्याची आठवण होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी शाळेत घंटा वाजवण्याच्या मागणीची अंमलबजावणी करावी अशी मागणी माजी नगरसेवकांनी केली आहे. याबाबतचा ठराव महापालिकेने नोव्हेंबर २०२० मध्ये मंजूर केला होता. मात्र करोनामुळे या ठरावाची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. आता या ठरावाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी माजी नगरसेवकांकडून करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> पावसाळ्यापूर्वी गोखले पुलाच्या दोन मार्गिका सुरू करण्याचा निर्धार; रेल्वे आणि महानगरपालिकेच्या बैठकीत जलदगतीने काम करण्यावर भर
दिवसभरात ठराविक वेळेच्या अंतराने पाणी पिणे हे शरीरासाठी आवश्यक असते. मात्र लहान मुलांना पाणी पिण्याचे लक्षात राहत नाही. लहान मुलांचे दिवसातील पाच ते सात तास शाळेत जातात. या कालावधीत त्यांनी किमान तीन वेळा पाणी पिणे आवश्यक असते. मात्र अभ्यास, खेळ यामुळे मुले पाणी पित नाहीत. त्यामुळे मुलांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी शाळांमध्ये ठराविक वेळाने घंटा वाजवावी अशी मागणी माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी २०१९ मध्ये केली होती. केरळ राज्यातील शाळांमध्ये अशा प्रकारे घंटा वाजवली जाते. त्याच धर्तीवर मुंबईतील शाळांमध्ये एका सत्रात तीन वेळा घंटा वाजवावी, अशीही मागणी पडवळ यांनी केली होती. सभागृहाने हा ठराव मंजूर केला होता व अभिप्रायासाठी प्रशासनाकडे पाठवला होता.
हेही वाचा >>> मुंबई : पदपथांवर दुकानांना परवानगी हे उद्देशाला सुरूंग लावण्यासारखे ; उच्च न्यायालयाची टिप्पणी
शिक्षण विभागाने ही सूचना मान्य केली होती. या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधितांना परिपत्रकही पाठवले होते. पुरेसे पाणी प्यायल्यामुळे मुत्राशयाचे त्रास, उलटी होणे, भोवळ येणे, शरीरातील पाणी कमी होणे या समस्या मुलांना भेडसावणार नाहीत, असे सांगत प्रशासनाने या सूचनेचे स्वागत केले होते. तसेच २०२०-२१ च्या शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पात या सूचनेची घोषणाही करण्यात आली होती. मात्र त्यानंतर करोना व टाळेबंदी लागू झाल्यामुळे शाळा बंद होत्या. मात्र आता शाळा पूर्ववत सुरू झाल्यामुळे या योजनेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी पडवळ यांनी शिक्षणाधिकारी राजू तडवी यांना पत्र पाठवून केली आहे.