सोसायटय़ा आणि झोपडपट्टय़ांमधून मिठी आणि वाकोला नदीमध्ये सोडण्यात येणारा मैला पाण्याचा प्रवाह तातडीने बंद करून नद्या शुद्ध करण्याचे निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिल्यानंतर एक वर्षांने पालिकेला जाग आली आहे. या नद्या निर्मळ बनविण्याचा संकल्प सोडत पालिकेने मैला पाणी त्यात जाऊ नये यासाठी कृतीआराखडा तयार करण्याचे काम आयआयटीला देण्याचा निर्णय घेतला आहे.
एकेकाळी झुळूझुळू वाहणाऱ्या मुंबईमधील मिठी आणि वाकोला या नद्या आसपासच्या सोसायटय़ा आणि झोपडपट्टय़ांमधून सोडण्यात येत असलेल्या मैला पाण्यामुळे मलीन झाल्या आहेत. या दोन्ही नद्यांमध्ये सोडण्यात येणाऱ्या मैला पाण्याचा प्रवाह रोखून त्या निर्मळ करण्याचे निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळाने एक वर्षांपूर्वी दिले होते. इतकेच नव्हे तर त्यासाठी २५ लाख रुपयांचे हमीपत्रही पालिकेकडून लिहून घेण्यात आले आहे. मात्र वर्षभरानंतर आता पालिकेला जाग आली आहे.
मिठी आणि वाकोला नदीत मैला पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मैला पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी दोन्ही नद्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यासाठी सल्लागार म्हणून आयआयटीची नेमणूक करण्यात येणार आहे.
सर्वेक्षणाच्या कामासाठी पालिकेला ८० लाख रुपये खर्च येणार आहे. नाल्यांमधील प्रदुषणाची पातळी मोजणे, दोन्ही नद्यांना जोडलेल्या मुख्य नाल्यांचे सर्वेक्षण करणे, नाल्यातील तरंगता कचरा, माती, गाळ, मलजलाचे वर्गीकरण करणे, मलजलाची रासायनीक व जैविक प्रतवारी करणे, नद्यांच्या शुद्धीकरणासाठी उपाययोजना सुचविणे, शुद्धीकरणासाठी संकल्पचित्र तयार करणे आदी कामांचा त्यात समावेश आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा