शिवाजी पार्कवर होणाऱया शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला मुंबई महापालिकेच्या जी-उत्तर विभागाच्या वॉर्ड अधिकाऱयाने परवानगी नाकारली आहे. अर्थात वॉर्ड अधिकाऱयाने परवानगी नाकारल्यानंतर शिवसेनेच्यावतीने पालिका आयुक्तांकडे परवानगी मागण्याचा पर्याय खुला आहे. महापालिका आयुक्त आपल्या विशेष अधिकारात शिवसेनेला परवानगी देऊ शकतात, अशी माहिती मिळालीये. शिवसेना परवानगी मागण्यासाठी न्यायालयाचाही दरवाजा ठोठावू शकते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली होणारा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. त्यातच आता महापालिकेने परवानगी नाकारल्यानंतर शिवसेना काय भूमिका घेते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
शिवाजी पार्कचा परिसर हा शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे तिथे कोणतीही सभा घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. गेल्यावर्षीही शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली होती.

Story img Loader