शहरातील मलनि:सारण वाहिन्यांमधून निघणाऱ्या दुषित पाण्यावर नवी मुंबई पालिकेने योग्य ती पक्रिया केल्याने ते पिण्याजोगे झाले असल्याने उद्योगांसाठी वापरण्याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विचार करित आहे. त्याबाबत लवकरच सव्र्हेक्षण करण्यात येणार असल्याचे समजते.
पािलकेने लाखो रुपये खर्च करुन ही प्रक्रिया केंद्र उभारली खरी पण त्यातील शुध्द पाण्याला अद्याप ग्राहक न मिळाल्याने पालिका अशा ग्राहकाच्या शोधात आहे. त्यात एमआयडीसीने असे सव्र्हेक्षण हाती घेण्याचे ठरविल्याने पालिकेला आशेचा किरण दिसू लागला आहे.
नवी मुंबई पालिकेने शहरातील पाच सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर सुमारे ३२५ कोटी रुपये खर्च करुन पाच आधुनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारली आहेत. केंद्र सरकाराने मध्यंतरी देशातील सर्व पालिकांना अशाप्रकारे सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते समुद्रात किंवा नदीत सोडण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे त्याची अंमलबजावणी नवी मुंबई पालिकेने तत्परतेने केली आहे. यासाठी पालिकेला केंद्र सरकारचा पुरस्कार देखील मिळाला आहे.
सीबीडी, नेरुळ, सानपाडा, वाशी, ऐरोली येथील सांडपाणी प्रक्रिया अद्यावत करण्यात आले असून तेथील सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते पिण्याजोगे होते असा पालिकेचा दावा आहे. हे पाणी विकण्याची योजना होती पण पालिकेला अद्याप हे पाणी घेणारा ग्राहक मिळालेला नाही. शहरातील २५० दशलक्ष सांडपाण्यावर या केंद्रामधून प्रक्रिया करुन ते शुध्द केले जात आहे.
राज्यात निर्माण झालेल्या पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्यासाठी पालिकेने एमआयडीसीला हे पाणी घेण्याची गळ गतवषर्षी ६ ऑगस्ट रोजी घातली होती. उद्योजकांना उत्पादन प्रक्रियेसाठी लागणारे पाणी पिण्याचे न वापरता असे शुध्दीकरण केलेल वापरण्यात यावे अशी सूचना पालिका आयुक्त भास्कर वानखेडे यांनी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एका पत्राद्वारे केली आहे. त्यानुसार एमआयडीसीने हे पाणी विकत घेण्याच्या दृष्टीने त्याचे सव्र्हेक्षण करण्याचे ठरविले आहे.
येत्या पंधरा दिवसात पालिका आधिकारी व एमआयडीसीचे अधिकारी या योजनेचे सव्र्हेक्षण करणार आहेत. यात सांडपाणी केंद्रापासून एमआयडीसीच्या जलवाहिन्यापर्यंत हे पाणी आणण्यासाठी किती खर्च होईल याचा तांत्रिक अंदाज घेतला जाणार आहे. एमआयडीसीने हे पाणी विकत घेतल्यास तेवढय़ाच पिण्याच्या पाण्याची बचत होऊ शकेल असा विचार पाणीतज्ज्ञाकडून केला जात आहे पण हे पाणी घेण्यास उद्योजक तयार होणार नाहीत असा एक मतप्रवाह देखील व्यक्त केला जात आहे.
सांडपाण्यावरील प्रक्रियेमुळे खाडीकिनारे स्वच्छ
पालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते जवळच्या खाडीत सोडण्यास सुरुवात केल्यापासून या खाडीत जलचर प्राण्याचे तसेच माशांची पैदास वाढल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे दूषित पाण्याने दिसणारी खाडीकिनारा अलीकडे काही प्रमाणात चांगला दिसू लागला असल्याचे प्राणी-पक्षी निरीक्षकांचे मत आहे.