डॉकयार्ड रहिवाशांना घाटकोपरऐवजी भायखळा येथे ‘म्हाडा’ इमारतीत पर्यायी घरे देण्यात येणार असून त्यासाठी कोणतेही अतिरिक्त भाडे द्यावे लागणार नाही़ तसेच जखमींवरील औषधांचा खर्चही पालिका देईल, असे अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैसकर यांनी बुधवारी स्पष्ट केले. डॉकयार्ड इमारत दुर्घटनाग्रस्त रहिवाशांची दुखे प्रसारमाध्यमांकडून कळल्यानंतर पालिका प्रशासनाकडून हे स्पष्टीकरण दिले गेले.
दोन महिन्यांपूर्वी, २७ सप्टेंबर रोजी झालेल्या डॉकयार्ड दुर्घटनेत ६१ जणांचा मृत्यू झाला होता. त्यातील ५३ मृतांच्या वारसांना एक कोटी २९ लाख रुपयांच्या मदतनिधीचे वाटप झाले आहे. पाच व्यक्तींचे वारस शहराबाहेर आहेत तर तीन मृतांचे वारस नक्की झालेले नाहीत. दहा मृत कर्मचाऱ्यांपैकी पाच जणांच्या वारसांची नोकरी निश्चित झाली आहे, दोघांची नोकरी मान्यतेच्या मार्गावर आहे. दोघांनी शैक्षणिक अर्हतेबाबत कागदपत्रे दाखल केलेली नाहीत तर एक वारस अज्ञान असल्याने तिच्याबाबतचा हक्क राखून ठेवला जाणार आहे, अशी माहिती म्हैसकर यांनी दिली.
घाटकोपर येथील घरांबाबत १९ रहिवाशांना ताबापत्र देण्यात आले होते. मात्र घाटकोपरऐवजी भायखळा येथील सिमप्लेस गिरणीमध्ये पर्यायी जागा देण्यात येत असून त्यासाठी ते सध्या देत असलेले चार हजार रुपये भाडेच आकारले जाईल. त्याचप्रमाणे नायर तसेच जेजे मध्ये उपचार घेत असलेल्या जखमींना बाहेरून औषधे लिहून दिली गेली तर त्याबाबत भरपाई दिली जाईल, असेही म्हैसकर यांनी स्पष्ट केले.
दागिने तसेच पैशांसंबंधीचे मुद्दे पोलिसांशी संबंधित असून त्याबाबत पोलीस विभागाशी समन्वय साधला जाईल. दुर्घटनाग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी बाजार विभाग तसेच प्रभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांना त्यांच्यासोबत बैठक घेण्यास सांगण्यात येईल, असेही या वेळी पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
डॉकयार्ड दुर्घटनाग्रस्तांना महापालिकेकडून मदत
डॉकयार्ड रहिवाशांना घाटकोपरऐवजी भायखळा येथे ‘म्हाडा’ इमारतीत पर्यायी घरे देण्यात येणार असून त्यासाठी कोणतेही अतिरिक्त भाडे द्यावे लागणार नाही़ तसेच जखमींवरील औषधांचा खर्चही पालिका देईल,
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-11-2013 at 03:05 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc will help dockyard road dockyard road building crash victims