मुंबई : पुढील वर्षीचा गणेशोत्सवही पर्यावरणपूरक व्हावा याकरीता मुंबई महापालिकेने मुर्तिकारांना शाडूची माती व जागा मोफत उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी मुंबई महापालिकेने आयोजित केलेल्या बैठकीत पालिका प्रशासनाने ही माहिती दिली. मात्र पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी केवळ माती देऊन जबाबदारी झटकता येणार नाही तर या विषयाचे राजकारण थांबवले पाहिजे असे मत मूर्तीकारांच्या संघटनेने व्यक्त केले आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींवर २०२० मध्ये बंदी घातली होती. मात्र विविध कारणांमुळे या निर्णयाची अंमलबजावणी लांबणीवर पडली. बंदी घालून चार वर्षे झाली तरी सार्वजनिक मंडळे आणि मूर्तिकार यांना पीओपीच्या वापरापासून प्रवृत्त करण्यासाठी राज्य सरकारसह अन्य यंत्रणा अपयशी ठरल्यावरून उच्च न्यायालयाने महापालिका, राज्य सरकार यांच्या भूमिकेवर वारंवार ताशेरे ओढले होते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या तोंडावर दरवर्षी पीओपी बंदीचा विषय पुन्हा चर्चेत येत असतो. पुढील वर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा म्हणून पालिकेने आतापासून नियोजन सुरू केले असून याबाबतची एक प्राथमिक बैठक गेल्या आठवड्यात पार पडली. या बैठकीला गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी, गणेशोत्सव समन्वय समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत पीओपीला सक्षम पर्याय देण्याकरीता सीपीसीबीसह एक बैठक घेण्याचा ठराव करण्यात आला. तसेच या बैठकीत पुढील वर्षाकरीता मुंबई महापालिकेतर्फे मूर्तीकारांना पर्यावरणपूरक मूर्ती घडवण्यासाठी मोफत जागा व शाडूची माती देण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त प्रशांत सपकाळे यांनी दिली.

हेही वाचा…मुंबई : गाडीचा धक्का लागला म्हणून खून…

माती देण्याचा केवळ दिखावा नको मूर्तिकारांचे म्हणणे…

सन २०२४ च्या गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेने तब्बल पाचशे टन शाडूची माती मोफत दिली होती. मात्र ही माती देण्याचा केवळ दिखावा पालिका प्रशासनाने करू नये असे मत मूर्तीकारांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले आहे. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात माती देण्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर माती मिळून, मुर्ती घडवणे पावसाळ्यात त्या सुकवणे शक्य होत नाही. त्यामुळे यंदा माती जानेवारी महिन्यात द्यावी व चांगल्या दर्जाची द्यावी अशी मागणी मुर्तिकारांच्या संघटनेने केली आहे.

हेही वाचा…किशोरवयीन मुला-मुलींसाठी ‘मैत्री क्लिनिक’ ठरतेय आधार! साडे सोळा लाख मुला-मुलींना मार्गदशन…

पीओपीचे केवळ राजकारण…

श्रीगणेश मूर्तिकला समितीचे वसंत राजे यांनी पालिकेच्या निर्णयाबाबत मत व्यक्त करताना सांगितले की, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींसाठी सक्षम पर्याय उपलब्ध असताना फक्त गणेशोत्सवाचे राजकारण करण्यासाठी चालढकल केली जात आहे. पीओपी मूर्ती निर्माते कारखानदारांना पाठबळ देण्यासाठी त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी हा वेळकाढूपणा करत असल्याचा आरोपही राजे यांनी केला आहे. त्यात अधिकारी आणि राजकारणी यांचे संगनमत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Story img Loader