मुंबई : मुंबई महापालिकेतर्फे पूर्व उपनगरातील मुलुंड येथे लवकरच एक पक्षीगृह उभारण्यात येणार आहे. येत्या वर्षभरात या कामाला वेग येण्याची शक्यता आहे. विविध प्रकारच्या पक्ष्यांचा समावेश असलेले उद्यान या ठिकाणी साकारण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्व उपनगरवासियांना लवकरच विरंगुळ्याचे एक ठिकाण मिळू शकणार आहे.
मुलुंड पश्चिमेकडे नाहूर गाव परिसरात सीटीएस क्रमांक ७०६ हा भूखंड पालिकेने उद्यान व वाहनतळ या उद्देशासाठी आरक्षित आहे. या आरक्षित भूखंडाचा विकास करण्यात येणार असून या ठिकाणी सर्व सुविधांनी युक्त असे उद्यान तयार करण्यात येणार आहे. तसेच या उद्यानात पक्षीगृह तयार करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेने या कामासाठी २०२३ मध्ये निविदा मागवल्या होत्या. मात्र केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडे या कामासाठी पाठपुरावा सुरू होता. या वर्षभरात या कामाला वेग येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांनी दिली. या पक्षीगृहात सर्व प्रकारचे पक्षी असतील. भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई उद्यानातील पक्षीगृहच्या धर्तीवर हे पक्षीगृह असेल.
हेही वाचा…मॅरेथॉनच्या मार्गावर प्रदूषणाची पातळी मोजणार, आठ एअर क्वालिटी मॉनिटरिंग मोबाइल व्हॅन तैनात
मुलुंड येथे प्रस्तावित पक्षी उद्यानात १८ दुर्मीळ प्रजातींसह २०६ प्रजातींचे पक्षी असणार आहेत. मुंबई महापालिकेच्या योजनेनुसार मुलुंड पक्षी उद्यान हे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयाचे (भायखळा) उपकेंद्र असणार आहे. याचे क्षेत्रफळ १७ हजार ९५८ चौरस मीटर आहे. पक्षीगृहासाठी १० हजार ८५९ चौरस मीटर आणि खेळांसाठी ३ हजार ७२८ चौरस मीटर क्षेत्र या उद्यानात राखीव असणार आहे. या पक्षी उद्यानात आशियाई, आफ्रिकी, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका अशी पक्षांची क्षेत्रवार विभागणी असणार आहे. प्रत्येक पक्ष्यांच्या प्रजातींचे निवासस्थान उभारण्यात येणार आहे. रेड ब्रेस्टेड पॅराकीट, ब्लॉसम हेडेड पॅराकीट, व्हाईट पीकॉक, मलबार ग्रे हॉर्नबिल, ब्लॅक हंस, ब्लॅक मुनिया, कोकाटू गालाह, ओस्ट्रिचेस, स्कॉलेट, स्कॉलेट, स्कॉलेट या काळाच्या ओघात लुप्त झालेल्या दुर्मिळ १८ प्रजातींचे २०६ पक्षी येथे पाहता येणार आहेत. पक्षी उद्यानात नैसर्गिक निवारे असतील. पक्ष्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासांप्रमाणेच या उद्यानात वाढण्यास त्यामुळे मदत होणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
पक्षी उद्यानासाठी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडे आमदार मिहीर कोटेचा यांनी पाठपुरावा केला होता. पक्षी उद्यानामुळे या मुलुंडमधील नागरिकांना विरंगुळ्याचे एक मोठे ठिकाण उपलब्ध होणार आहे. पक्षीप्रेमींसाठी ही एक पर्वणी असेल.पक्षी उद्यानासाठी तात्पुरती परवानगी मिळाली आहे, पण अद्याप काही गोष्टींची पूर्तता बाकी आहे. यावर्षी आम्ही या प्रकल्पाला वेग देऊ. अमित सैनी, अतिरिक्त आयु्क्त, मुंबई महानगरपालिका