पावसाळ्यात दैना उडालेल्या मुंबईतील रस्त्यांवर एक हजार कोटी रुपयांची मलमपट्टी लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या कामांच्या निविदा नोव्हेंबरच्या अखेरीस काढण्यात येणार असून लवकरात लवकर कामे हाती घेण्यात येणार आहेत.
पावसाळ्यात खड्डय़ांत गेलेल्या रस्त्यांची दुरुस्ती आणि निर्मितीची कामे हाती घेण्याचा निर्णय प्रशासनाने हाती घेतला आहे. पूर्व उपनगरांमध्ये ७३ कोटी रुपये खर्च करून काही रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शहरातील सुमारे ६८, तर पूर्व उपनगरातील ४३ रस्त्यांचे २४० कोटी रुपये खर्च करून डांबरीकरण करण्याचा पालिकेचा मानस आहे. शहरातील १०३ लहान रस्त्यांची ९७ कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पश्चिम उपनगरांतील ३७ मोठय़ा रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार असून त्यावर ४८२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ११० कोटी रुपये खर्च करून मुख्य ३५ चौकांमध्ये मास्टिक पद्धतीने डांबरीकरण करण्यात येणार आहे. या कामांसंदर्भात नोव्हेंबरमध्ये निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता दीक्षित यांनी स्थायी समितीच्या अनौपचारिक बैठकीत दिली. रस्त्यांवर वारंवार पडणारे खड्डे, पेव्हर ब्लॉक बसविणे कायमस्वरुपी बंद करावे, रस्त्यांची निर्मिती करण्यापूर्वी संबंधित सेवा वाहिन्यांच्या पुरवठादारांना माहिती द्यावी, सेवा वाहिन्यांची कामे रस्ते निर्मितीदरम्यान करावी, स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेऊन रस्त्यांची कामे करावी, रस्ते निर्मितीनंतर तात्काळ रस्त्यांवर नामफलक बसवावेत, झेब्रा क्रॉसिंग, गतिरोधकांची कामे तातडीने करावीत, आदी सूचना नगरसेवकांनी यावेळी केल्या. हाती घेण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामाच्या निविदा नोव्हेंबपर्यंत काढाव्यात आणि रस्ते निर्मिती व दुरुस्तीच्या कामांमध्ये चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी यावेळी केली.

Story img Loader