आगीत धुमसणाऱ्या देवनार कचराभूमीतील कचऱ्याच्या डोंगरांमध्ये स्वैरसंचार करणाऱ्या भटक्या कुत्र्यांची धरपकड करण्यास सुरुवात झाली असून गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये केवळ १२ कुत्रे पालिका कर्मचाऱ्यांच्या हाती लागले आहेत. या कचऱ्याच्या डोंगरांवर सुसाट पळणाऱ्या कुत्र्यांची धरपकड करणे पालिका कर्मचाऱ्यांना अशक्य बनले असून आजही कचराभूमीत भटक्या कुत्र्यांचा स्वैरसंचार सुरूच आहे. परिणामी, भटकी कुत्री पालिकेची डोकेदुखी बनू लागली आहे.
देवनार कचराभूमीत लागलेली आग, त्यातून धुमसणारा धूर आणि अग्निशमन दल व घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत आग विझविण्यासाठी सुरू असलेले काम याची पाहणी करण्यासाठी पालिका आयुक्त अजय मेहता यांनी देवनार कचराभूमीला भेट दिली होती. या भेटीमध्ये कचराभूमीत स्वैरसंचार करणारी भटकी कुत्री, गाई, म्हैशी दृष्टीस पडताच अजय मेहता संतप्त झाले होते. कुत्री, गाई आणि म्हैशींना तात्काळ देवनार कचराभूमीतून बाहेर काढण्याचे आदेश पालिका अधिकाऱ्यांना दिले होते. तसेच रात्रीच्या वेळी आग विझविण्याचे काम करताना भटक्या कुत्र्यांमुळे अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार अग्निशमन दलाकडूनही करण्यात आली होती. या पाश्र्वभूमीवर कचराभूमीतील कुत्र्यांची धरपकड सुरू करण्यात आली होती.
देवनार कचराभूमीत आजघडीला शेकडोच्या संख्येने भटकी कुत्री स्वैरसंचार करीत आहेत. मुंबईकरांचा कचरा कचराभूमीत टाकल्यानंतर ही कुत्री त्यावर तुटून पडतात. याच कचऱ्यावर त्यांचे पोट भरत असून ही कुत्री तेथेच मुक्कामाला आहेत. कचरावेचक, कचरा गाडय़ांसोबत जाणारे कामगार, सुरक्षा रक्षक यांना या कुत्र्यांपासून सावध राहावे लागते. अनेक वेळा ही कुत्री कर्मचारी, कचरावेचकांच्या अंगावरही धावून येतात. त्यामुळे कचरा माफियांबरोबरच या कुत्र्यांचीही येथे प्रचंड दहशत आहे.
मुंबईमधील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करून त्यांना पुन्हा त्याच परिसरात सोडून दिले जाते. त्यासाठी पालिकेची श्वान प्रतिबंध वाहने कार्यरत आहेत. पालिका आयुक्तांच्या आदेशानंतर पालिकेच्या श्वान प्रतिबंध पथकाची तीन वाहने देवनार कचराभूमीत दाखल झाली होती. या वाहनांसोबत येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हाती दोरीचे फास घेऊन कुत्र्यांना पकडण्याची कारवाई सुरू केली. कर्मचारी पकडण्यासाठी येत असल्याचे पाहून ही कुत्री कचऱ्याच्या डोंगरांवर सुसाट पळत सुटतात. या डोंगरावर हातात दोरीचा फास घेऊन कुत्र्यामागे पळणे कर्मचाऱ्यांना अवघड बनत आहे. दोन-तीन दिवस अथक परिश्रम केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या हाती केवळ १२ कुत्री लागली. या कुत्र्यांना पालिकेच्या श्वानगृहामध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आजही कचराभूमीमध्ये शेकडोच्या संख्येने कुत्र्यांचा वावर सुरूच आहे. हे कुत्रे आता पालिकेला डोकेदुखी बनले आहेत.

Story img Loader