काम न करणाऱ्या संस्थांच्या पाठीवर पालिकेची मात्र शाबासकीची थाप
मुंबई महापालिकेच्या ‘दत्तक वस्ती योजने’च्या नावाखाली स्वच्छतेची थातूरमातूर कामे करून या योजनेतून मिळणारा मलिदा लाटण्याच्या प्रकारामुळे सांताक्रुझमधील वाकोला येथील गावदेवी परिसरात घाण आणि दरुगधीचे साम्राज्य वाढले आहे. आश्चर्य म्हणजे आपल्या भागात स्वच्छताच होत नसल्याची येथील रहिवाशांची तक्रार असताना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र या भागात योजनेअंतर्गत उत्तम काम होत असल्याचा शेरा देत ही योजना राबविणाऱ्या संस्थांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे.
झोपडपट्टीत साफसफाई, घराघरांतून कचऱ्याचे संकलन, छोटी गटारे, सार्वजनिक शौचालये आदींची स्वच्छता करण्याकरिता पालिकेतर्फे ही योजना राबविली जाते. यात प्रत्येक १० हजार घरांमागे एका संस्थेला वस्तीच्या स्वच्छतेची जबाबदारी सोपविली जाते. सामाजिक किंवा त्या त्या भागात काम करणाऱ्या संस्थांनी आपल्या वस्तीच्या स्वच्छतेकरिता पुढाकार घ्यावा या हेतूने हे योजना राबविली जाते. त्यात प्रत्येक सफाई कामगाराला ६ हजार रुपये इतके वेतन पालिका अदा करते. १० हजार कुटुंबाच्या वस्तीकरिता १४ व्यक्तींची नियुक्ती करून संस्थांनी वस्तीच्या स्वच्छतेची सर्व कामे करून घ्यावी, असे या योजनेत अपेक्षित आहे. तसेच, कामगारांची नियुक्ती करताना पॅनकार्ड, आधार कार्ड आदींची खातरजमा करून काम दिले जावे असे बंधन संस्थांवर घालण्यात आले आहे. मात्र, अनेक संस्था हे नियम धाब्यावर बसवून रस्त्यावर भीक मागणाऱ्या किंवा राहणाऱ्या लोकांकडून ही कामे करून घेतात.
याहून गंभीर म्हणजे १४ कामगारांऐवजी तीन किंवा चारच कामगार नेमून त्यांच्याकडून संपूर्ण वस्तीच्या स्वच्छतेचे काम उरकले जाते. उरलेले कामगार केवळ कागदावर दाखवून त्यांच्या वेतनाची रक्कम ठेकेदाराने खिशात टाकायची असा सगळा उद्योग सुरू आहे. यामुळे वस्तीत स्वच्छतेची कामे होत नसल्याने कित्येक ठिकाणी ही योजना कागदावरच आहे.
७ ऑगस्ट, २०१५ रोजी ‘गावदेवीत ‘दत्तक वस्ती योजने’चे तीनतेरा’ या मथळ्याखाली वृत्त देऊन ‘मुंबई वृत्तान्त’ने येथील रहिवाशांच्या समस्यांना वाचा फोडली होती. या बातमीवर पालिकेकडून कोणताही खुलासा तर आला नाहीच.
उलट या भागात कार्यरत असलेल्या संस्थांच्या कामाचे कौतुकच पालिकेने केले आहे. येथील एच/पूर्व भागात पाच संस्थांना १०० पैकी ६५, ६४, ६६ असे गुण देत या संस्था समाधानकारक कामगिरी करत असल्याचा अहवालच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचे येथील रहिवाशांनी माहितीच्या अधिकाराखाली उघड केले आहे.
अस्वच्छतेमुळे आजारांचे थैमान
या प्रभागातील दत्त मंदिर मार्गावरील लसूण वाडी, वागरी पाडा, मोसंबी तबेला या भागाची मिळून सुमारे ४० हजार लोकवस्ती आहे.
येथील ९० टक्के भाग बैठय़ा चाळी किंवा झोपडपट्टीसदृश आहे. परंतु, कमी कामगार नेमून काम भागवून नेण्याच्या संस्थांच्या गैरप्रकारांमुळे या भागातील कचरा रोजच्या रोज उचलला जात नाही. त्यामुळे, जागोजागी कचऱ्यांचे ढीग या ठिकाणी साचलेले दिसून येतात. पावसाळ्यात हा कचरा कुजून सर्वत्र दरुगधी भरून राहत असल्याची रहिवाशांची तक्रार आहे.
येथील शौचालयांमधील घाणपाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था नसल्याने वस्तीत सांडपाणी सर्वत्र साचून राहते. या मुळे या वर्षी या भागात डेंग्यूसारख्या आजारांनी थैमान घातले होते.
येथील रहिवाशांना स्वच्छतेअभावी या सर्व त्रासाला तोंड द्यावे लागत असताना काम करणाऱ्या संस्थांना मात्र प्रशस्तिपत्रक दिले जात आहे, या बद्दल येथील रहिवाशी सुहास विचारे यांनी संताप व्यक्त केला.
कामगारांच्या जीवाशी खेळ
नियम धाब्यावर बसवून कामगारांकडून काम करून घेण्याच्या संस्थांच्या निष्काळजीपणामुळे या ठिकाणी नुकताच एका कामगाराचा मृत्यू झाला. नाल्यात साफसफाई करताना हा कामगार पडला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला. या कामगाराला रुग्णालयात नेण्यासाठीही संबंधित संस्था पुढे आली नाही. त्यामुळे, तो बराच वेळ नाल्यात पडून होता. शेवटी स्थानिकांनी त्याला बाहेर काढून रुग्णालयात नेले. अशा निष्काळजीपणाने काम करून घेतले जात असल्याबद्दल संबंधित संस्थेच्या चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी रहिवासी सूर्यकांत मयेकर यांनी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा