मुंबई : मुंबई महापालिकेने भायखळ्याच्या प्राणीसंग्राहलयात एक छोटे मस्त्यालय उभारण्याचे ठरवले असून हा प्रकल्प सुरू होण्याआधी वादात सापडला आहे. बोगदा (टनेल) स्वरूपाचे हे मस्त्यालय अतिशय कमी जागेत बांधले जाणार असून त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो, तसेच या प्रकल्पाचा ६५ कोटी रुपये खर्च जास्त असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भायखळ्याच्या जिजामाता उद्यान व प्राणीसंग्रहालयात एक ‘एक्वा गॅलरी’ तयार करण्याचे ठरवले असून त्याची घोषणा चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात केली आहे. पेंग्विन कक्षासमोरील ५००० चौरस फूट जागेत हे लहानसे मस्त्यालय तयार करण्यात येणार आहे. बोगदा स्वरूपाच्या या मस्त्यालयात ३६० अंशातून मासे आणि समुद्री जीव, प्रवाळ पाहता येणार आहेत. पालिकेने या कामासाठी ६५ कोटी अंदाजित खर्चाच्या निविदा मागवल्या होत्या. मात्र या प्रकल्पावर आणि निविदा प्रक्रियेवर समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी आक्षेप घेतला आहे. ही निविदा रद्द करण्याची मागणी रईस शेख यांनी केली आहे.

रईस शेख यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना याबाबत पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पेंग्विन कक्षासमोरील पाच हजार चौरस फूट जागेत हे मत्स्यालय उभारण्यात येणार असून या जागेची उंची २० फुटपेक्षाही कमी आहे. आधीच या जागेत पेंग्विन बघायला येणाऱ्यांची रिघ लागते. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडल्यास या अरुंद जागेत चेंगराचेंगरी होऊ शकते, अशी भीती रईस शेख यांनी व्यक्त केली आहे. शिवाय मत्स्यालयाच्या लहान आकारामुळे पर्यटकाना मत्स्यालय पाहण्यास पुरेशी वेळ जागा मिळणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

अतिशय कमी जागा असूनही मस्त्यालय उभारणीसाठी अंदाजित केलेला ६५ कोटींचा खर्च जास्त आल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. तसेच निविदा प्रक्रियेत फक्त एकाच निविदाकाराने भाग घेतला असल्याबद्दलही रईस शेख यांनी आक्षेप घेतला आहे. निविदा प्रक्रियेत अनियमितता झाली असल्याचा आरोप करीत त्यांनी ही निविदा त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच प्रकल्पाच्या ढिसाळ नियोजनासाठी अधिकारी आणि सल्लागारांची चौकशी करण्याची मागणीही केली आहे. हे मस्त्यालय भविष्यात मृत्यूचा सापळा बनू शकेल. हे मत्स्यालय मफतलाल मिलच्या जमिनीवर स्थलांतरित करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmcs plan to set up aquarium at byculla zoo is project mired in controversy before its launch mumbai print news sud 02