शहरातील सार्वजनिक गणेशमूर्तींचे मंडपात आगमन सुरू होण्यास सुरुवात झाली असली तरी महानगरपालिकेने मात्र खड्डेदुरुस्तीसाठी १५ ऑगस्टचा मुहूर्त काढला आहे. खड्डय़ांमुळे गणेशमूर्तीच्या प्रवासालाही वेळ लागत असल्याने आधीच खड्डय़ांमुळे होत असलेल्या वाहतूककोंडीत भर पडत आहे.
गणेशोत्सवासाठी भव्य मंडप व त्यात श्रींच्या मूर्तीचे १५ दिवस आधीच आगमन, हा शहरातील सार्वजनिक मंडळांचा नेहमीचा शिरस्ता. यावेळी पावसाने एक महिन्याची जास्त मुदत देऊनही पालिकेला रस्ते ‘खड्डे मुक्त’ करण्यात अपयश आले. जुलैच्या अखेरच्या आठवडय़ातील चार दिवसांच्या पावसाने संपूर्ण शहर पुन्हा खड्डेमय करून टाकले आहेत. त्यातच गणेशचतुर्थी २९ ऑगस्ट रोजी येत असल्याने पालिकेने खड्डे बुजवण्याचा दुसरा टप्पा १५ ऑगस्टपासून हाती घेण्याचे ठरवले आहे.
या टप्प्यात गणेशमूर्तीचा प्रवास होत असलेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात येईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. महानगरपालिकेच्या रस्ता विभागाने १५ ते २३ ऑगस्टदरम्यानच्या आठवडय़ाभरात हे रस्ते बुजवण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र सार्वजनिक गणेशमूर्तीचे आगमन चतुर्थीच्या आधी १५ दिवस होत असताना शेवटच्या क्षणापर्यंत होणारी ही रस्तेदुरुस्ती कितपत कामी येईल, याबाबत गणेशोत्सव मंडळे साशंक आहेत. गिरगावपासून परळपर्यंतच्या परिसरातील तसेच उपनगरातही अनेक ठिकाणच्या मूर्ती यापूर्वीच मंडपात पोहोचल्या आहेत.
आमच्याकडे तक्रारी येत आहेत. मात्र यात मंडळांचा दोष नसून खड्डे दुरुस्त न करणाऱ्या महानगरपालिकेचा आहे, असे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर म्हणाले. २३ ऑगस्टपर्यंत खड्डे बुजवले नाहीत तर २४ ऑगस्ट रोजी खड्डय़ांचे छायाचित्र पाठवणाऱ्याचा सत्कार करून समन्वय समितीकडून प्रतिकात्मक निषेध नोंदवण्यात येणार आहे.
पालिकेचा १५ ऑगस्टपासून खड्डेदुरुस्तीचा मुहूर्त
शहरातील सार्वजनिक गणेशमूर्तींचे मंडपात आगमन सुरू होण्यास सुरुवात झाली असली तरी महानगरपालिकेने मात्र खड्डेदुरुस्तीसाठी १५ ऑगस्टचा मुहूर्त काढला आहे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-08-2014 at 03:12 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmcs road potholes patch up program for ganesh festival