झिजून ओबडधोबड झालेल्या जिन्यातून बाहेर आलेल्या लोखंडी सळ्या.. गच्चीवरील पाण्याच्या टाकीला लागलेल्या गळतीमुळे वर्षभर तळमजल्यापर्यंत होणारा अभिषेक.. धोकादायक स्थितीतील शौचालये.. पावसाळ्यात ओल्याचिंब होणाऱ्या भिंती.. अधूनमधून कोसळणारे सिलिंग.. ही अवस्था आहे वांद्रे येथील स्वामी समर्थ रामदास महापालिका मंडईची. या इमारतीची संरचनात्मक तपासणी करण्यासाठी कुणीच आलेले नाही, असा आरोप इमारतीमधील रहिवाशांकडून करण्यात येत आहे. डॉकयार्ड दुर्घटनेनंतर या इमारतीतील रहिवाशी कमालीचे धास्तावले आहेत.
वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ पश्चिमेला पालिकेच्या भूखंडावर बाजार भरत होता. त्याच्या शेजारी मॅथ्यू बंगला होता. मोडकळीस आलेला बंगला ताब्यात घेतला आणि पालिकेने आपल्या व बंगल्याच्या भूखंडावर १९८४ मध्ये चार मजली इमारत उभारली. पालिकेच्या बाजार आणि मालमत्ता या दोन विभागांची ही इमारत आहे. बंगल्यामध्ये राहणाऱ्या आठ रहिवाशांचे नव्या इमारतीत पुनर्वसन करण्यात आले. उर्वरित सदनिकांमध्ये पालिकेच्या बाजार आणि मालमत्ता विभागातील रहिवाशी राहावयास आले. या इमारतीतील ३६० चौरस फुटाच्या चार सदनिकांमध्ये वरिष्ठ अधिकारी, तर २१० चौरस फुटाच्या २० सदनिकांमध्ये कारकून आणि शिपायांचे कुटुंब वास्तव्यास आहे. तळमजल्यावरील जागा सहकारी भांडारसाठी देण्यात आली होती.
या इमारतीच्या भिंतींना तडे गेले आहेत. झिजलेल्या जिन्यातील सळ्यांमुळे रहिवाशी जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. गच्चीवरील पाण्याच्या टाकीतून होणाऱ्या गळतीमुळे शौचालय आणि जिन्याचा भाग धोकादायक बनला आहे. अधूनमधून काही सदनिकांमधील सिलिंगचा भाग कोसळत असतो. पावसाळ्यात गच्चीवरुन होणाऱ्या गळतीमुळे चौथ्या मजल्यावरील रहिवाशी त्रस्त झाले आहेत. रेल्वे मार्गालगत असलेली ही इमारत रेल्वेगाडी येताच हादरते. त्यामुळे या इमारतीची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी २०११ पासून रहिवाशांनी करीत आहेत. परंतु त्यांच्या तक्रारींना केराची टोपली दाखविण्यात आली आहे.
भुरटे चोर आणि गर्दुल्ल्यांचा या परिसरात प्रचंड वावर आहे. त्यामुळे इमारतीला लोखंडी दरवाजा बसवावा आणि सुरक्षा रक्षक तैनात करावा, अशी मागणीही रहिवाशांनी केली होती. परंतु या दोन्ही मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत.
राजकीय शिरजोरीचे ओझे..
खार येथील रिक्त केलेल्या धोकादायक मंडईतील एका अभियंत्याने राजकीय वजन वापरुन स्वामी समर्थ रामदास मंडईतील पहिल्या मजल्यावरील दोन सदनिका मिळविल्या आहेत. या दोन सदनिकांमधील भिंत तोडून त्याने स्वत:साठी एक सदनिका तयार केली आहे. या बदलामुळे इमारत आणखी कमकुवत झाल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे. दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशी करत आहेत.
पालिकेच्या समर्थ रामदास मंडईची दैना
झिजून ओबडधोबड झालेल्या जिन्यातून बाहेर आलेल्या लोखंडी सळ्या.. गच्चीवरील पाण्याच्या टाकीला लागलेल्या गळतीमुळे वर्षभर
First published on: 29-09-2013 at 01:36 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmcs samarth ramdas market building likely to collaps