मुंबई : शिवसेना उपनेते राजेश शहाने मुलगा मिहिरला अपघातानंतर चालक गाडी चालवत असल्याचे सांगू, तू पळून जा, असा सल्ला दिल्याचे चौकशीत उघड झाले आहे. वरळी येथे कावेरी नाखवा यांना गाडीने धडक दिल्यानंतर आरोपी मिहिर याने त्याचे वडील राजेश शहा यांना दूरध्वनी केला होता. त्यावेळी, शहा यांनी मिहिर याला पळून जाण्यास सांगितले. तसेच, हा अपघात चालक राजऋषी बिडावत याने केल्याचे सांगू, असे सांगितल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या राजेश शहा यांना न्यायालयाने सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. दुसरा आरोपी राजऋषी बिडावत याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. राजऋषी हा शहा कुटुंबीयांचा चालक असून अपघातावेळी मिहिरच्या शेजारी गाडीमध्ये बसला होता.
वरळी येथील अपघातानंतर पोलिसांनी उपनेते राजेश शहा यांना रविवारी अटक केली होती. शहा यांच्यावर मुख्य आरोपी असलेला मुलगा मिहिर शहा याला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे.
कावेरी या पती प्रदीप नाखवा यांच्यासह रविवारी पहाटे क्रॉफर्ड मार्केट येथे मासे आणण्यासाठी गेल्या होत्या. दोघेही दुचाकीवरून वरळीच्या दिशेने येत असताना सकाळी पाच वाजून २५ मिनिटांनी हाजी अलीवरून थोडे पुढे आल्यावर अॅनी बेझंट रोडवरील लँडमार्क जीप शोरूम समोर मिहिर याने मोटरगाडीने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. त्यावेळी, प्रदीप मोटरगाडीच्या बॉनेटवर आपटून डाव्या बाजूला पडले. तर कावेरी या मोटरगाडीच्या समोर पडल्या. परंतु, गाडी थांबवायची सोडून आरोपीने मोटरगाडी भरधाव वेगाने नेली. त्यावेळी, मोटरगाडीसह कावेरी यांना फरफटत नेले. त्यांनतर वांद्रे येथील कलानगर परिसरात आरोपीने मोटरगाडी व राजऋषी बिडावत याला सोडून तेथून पलायन केले. या अपघातात कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला,
हेही वाचा >>> राज्यातील १५ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
आरोपींचे निर्दयी कृत्य
मृत कावेरी या अपघातात मोटरगाडीच्या बंपर व चाकाच्या मध्ये अडकल्या होत्या. सुमारे दोन किलोमीटर कावेरी यांना तसेच फरफटत आणल्यानंतर वरळी सीफेस येथे आरोपी मिहिर शहा व शेजारी बसलेला राजऋषी बिडावत मोटरगाडीतून बाहेर पडले. त्यांनी मोटरगाडीत अडकलेल्या कावेरी यांना बाहेर काढले व तसेच रस्त्यावर टाकले. त्यानंतर आरोपींनी मोटरगाडी बाजूने न नेता कावेरी यांच्या अंगावरून नेली. सीसीटीव्ही चित्रीकरणातून अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. सीसीटीव्हीत तपासणीत मरिन ड्राईव्हपर्यंत राजऋषी बिडावत हा मोटरगाडी चालवत होता. मरिन ड्राईव्हपासून पुढे मिहिर मोटरगाडी चालवत होता. वरळी सीफेस जवळ मोटरगाडीत अडकलेल्या कावेरी यांना बाहेर काढल्यानंतर राजऋषीने चालकाच्या आसनावर बसला व गाडी चालवू लागला. त्यावेळी त्याने गाडी बाजूने न नेता थेट कावेरी यांच्या अंगावरून मोटरगाडी नेली. .
मिहिर मैत्रिणीच्या घरी
अपघातानंतर मिहिर शहाला त्याचे वडील राजेश शहा यांनी पळून जाण्याच्या सूचना दिल्यानंतर मिहिरने गोरेगाव परिसरात राहणाऱ्या मैत्रिणीला दूरध्वनी करण्यास सुरुवात केली. यादरम्यान जवळपास तीस ते चाळीस दूरध्वनी मैत्रिणीला केले. मैत्रिणीचे घर गाठून तिला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर दोन तास तेथे झोपला. मैत्रिणीने याबाबत त्याच्या घरी दूरध्वनी करून सांगताच, त्याच्या बहिणीने मैत्रिणीचे घर गाठले. त्यानंतर बहीण त्याला घेऊन बोरिवली येथील घरी गेली. तेथून घराला कुलूप आरोपी लावून आई मीना आणि बहिणीसह पळून गेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी मिहिरची आई व बहिणीलाही आरोपी करण्याची शक्यता आहे.
राजेश शहाला जामीन
आरोपी राजेश शहा व बिडावत या दोघांनाही वरळी पोलिसांनी स्थानिक न्यायालयापुढे हजर केले. त्यावेळी सरकारी वकील भारती भोसले यांनी चौकशीसाठी दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचे न्यायालयाला सांगितले. तसेच आरोपी राजेश शहाने आरोपीला पळून जाण्यात मदत केल्याचा युक्तिवाद न्यायालयापुढे केला. त्याला बचाव पक्षाने विरोध केला. राजेश शहा याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २३८(पुरावा नष्ट करणे, चुकीची माहिती देणे) लागू होतो. हे कलम जामीनपात्र असल्यामुळे राजेश शहा यांना आधी नोटीस देणे आवश्यक होते. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यावर न्यायालयाने याप्रकरणी शहा याला जामीन दिला.
आरोपीच्या शोधासाठी ११ पथके
मिहिर शहाच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी ११ पथके स्थापन केली आहेत. याशिवाय गुन्हे शाखाही मिहिरचा शोध घेत आहे. आरोपी परदेशात पळण्याची शक्यता लक्षात घेता, सोमवारी मिहिरविरोधात लुक आऊट सर्कुलर जारी करण्यात आले होते.