मुंबई : बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस) स्वच्छ, सुंदर आणि निसर्ग जागरुकता वाढविण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या स्वच्छता मोहिमेत तब्बल १२० किलो कचरा गोळा करण्यात आला. विशेष म्हणजे अवघ्या एक तासात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत १०० स्वयंसेवक सहभागी झाले होते.
या मोहिमेदरम्यान दादासाहेब फाळके चित्रनगरी बस थांब्यापासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हाथी गेटपर्यंतच्या रस्त्याची साफसफाई करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत १०० स्वयंसेवक सहभागी झाले होते. स्वच्छता मोहिमेदरम्यान सुमारे १२० किलो कचरा गोळा करण्यात आला. या कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारुच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, कपडे आदींचा समावेश होता. कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात येत नसल्यामुळे या परिसरात डुकरांचा वावर वाढल्याचे निदर्शनास आले.
हेही वाचा…अभ्युदयनगर पुनर्विकासाच्या निविदेला मुदतवाढ ?
विघटनशील, तसेच अविघटनशील कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने व्हावी या हेतूने बीएनएचएसने या स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले आहे. या मोहिमेदरम्यान संकलित केलेला कचरा चित्रनगरी येथील महापालिकेच्या कचरा संकलन केंद्रात जमा करण्यात आला.
वन्यप्राण्यांचा वावर लक्षात घेता राष्ट्रीय उद्यान परिसरात कचरा टाकण्यास बंदी आहे. तरीही नागरिक तेथे निष्काळजीपणे कचरा टाकतात. दरम्यान, येत्या काळात स्वच्छता मोहिमेदरम्यान आणखी काही योजना बीएनएचएस राबविणार आहे.