शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी गेलेल्या स्पीड बोटला अपघात झाला. यानंतर शिवस्मारक प्रकल्प समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. अरबी समुद्रात शिवस्मारक बांधण्यात येणार आहे. या शिवस्मारकाच्या पायाभरणीला जाताना स्पीडबोट खडकावर आदळली. या अपघातात सिद्धेश पवार नावाच्या तरूणाचा मृत्यू झाला. बुधवारी ही घटना घडल्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मेटेंवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे म्हटले आहे.

एवढंच नाही तर सिद्धेश पवारच्या मृत्यूसाठी विनायक मेटे यांनाच जबाबदार धरलं गेलं पाहिजे असंही विखे पाटील यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली. शिवस्मारकाची किंमत १३२६ कोटींनी कमी केल्याचाही आरोप विखे पाटील यांनी केला आहे. अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाची किंमत आधी ३ हजार ८२६ कोटी होती मात्र ती आता २५०० कोटी करण्यात आली. जानेवारी महिन्यात मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय झाला होता. या बैठकीला विनायक मेटे, मुख्य सचिव आणि सुभाष देसाई या सगळ्यांची उपस्थिती होती असंही त्यांनी सांगितलं.

शिवस्मारकाच्या पायाभरणीवेळी झालेल्या दुर्घटनेप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. यावेळी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. हे सर्व ज्यांनी घाईघाईने श्रेय लाटण्यासाठी करण्याचा प्रयत्न केला आणि इतक्या लोकांचे प्राण संकटात आणले, त्याला जे कोणी जबाबदार असतील, त्यांच्यावर प्रथम गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी असे राऊत यांनी म्हटले आहे. एकीकडे शिवसेनेही टीका केलेली असतानाच राधाकृष्ण विखे पाटील यांनी विनायक मेटेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं.