मुंबई : गेटवे ऑफ इंडिया येथून मांडवा जेटीकडे मार्गस्थ झालेल्या अजंठा कंपनीच्या बोटीला शुक्रवारी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे छिद्र पडले. बोटीत पाणी भरू लागल्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. मात्र, स्पीड बोटींच्या साहाय्याने सर्व अडकलेल्या प्रवाशांची सुरक्षित सुटका झाल्याने मोठी दुर्घटना टळली. गेट वे ऑफ इंडिया येथून अजंठा कंपनीची प्रवासी बोट शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास १३० लोकांना घेऊन मांडवा येथे जाण्यासाठी निघाली होती.

मांडवा जेटीपासून साधारण १ ते १.५ किमी अंतरावर असताना समुद्रात वेगाने वारे वाहू लागले. परिणामी, बोट फायबरची असल्याने तिला छिद्र पडले आणि बोटीत पाणी शिरू लागले. बोटीतून प्रवाशांनी तत्काळ मांडवा जेटीला संबंधित घटनेची माहिती दिली. त्यानंतर, दुर्घटनास्थळी तातडीने स्पीड बोट पाठविण्यात आल्या. तसेच, बोटीत अडकलेल्या १३० प्रवाशांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले.