शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. मॉरिस नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. दहिसर या ठिकाणी ही घटना घडली आहे. या प्रकरणी आता गोळीबार करणाऱ्या मॉरिसने स्वतःवर गोळ्या झाडल्या आणि त्याचं आयुष्य संपवलं ही माहिती समोर आली आहे. ANI ने हे वृत्त दिलं आहे.
मॉरिसची आत्महत्या
ANI ने दिलेल्या वृत्तानुसार मॉरिस नोरोन्हा याने अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या त्यानंतर त्याने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्याआधी त्याने फेसबुक लाईव्हही केलं होतं.
कोण होता मॉरिस?
मॉरिस नावाचा इसम दहिसर- बोरिवली परिसरात स्वयंसेवी संघटना चालवत असल्याची माहिती आहे. स्थानिक राजकीय वर्तृळात मॉरिस नावाच्या व्यक्तीला स्वयंघोषित नेता म्हणून ओळखले जायचे. गणपत पाटील नगरमध्ये मॉरिस काम करत होता.
हे पण वाचा- “अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार झाला कारण, मंत्रालयात बसलेली गुंडांची टोळी..”, आदित्य ठाकरेंची टीका
फेसबुक लाईव्ह व्हीडिओत काय दिसतंय?
अभिषेक घोसाळकर यांनी मॉरिस नावाच्या व्यक्तीबरोबर फेसबुक लाइव्ह केलं होतं. मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांना त्यांच्याच कार्यालयात एका कार्यक्रमाकरता बोलावलं होतं. यानिमित्ताने ते फेसबुक लाइव्हवरून संवाद साधत होते. संवाद संपल्यानंतर सुरुवातीला मॉरिस उठून निघून गेला. त्यानंतर, अभिषेक घोसाळकर लाईव्हद्वारे संवाद साधत होते. ही तर फक्त सुरुवात आहे. आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे, असं अभिषेक घोसाळकर फेसबुक लाईव्हमध्ये बोलत होते. त्यांचा हा संवाद संपताच अभिषेक घोसाळकरही जागेवरून उठले. ते उठताच त्यांच्यावर गोळीबार झाला. ते उठून गेल्यानंतर गोळ्यांचा आणि ओरडण्याचा आवाज व्हिडीओतून येत आहे. एवढंच नव्हे तर गोळीबार झाल्यानंतरही फेसबुक लाईव्ह पाऊणतास सुरूच होतं.