लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : पदपथांवर बसवण्यात आलेल्या स्टीलच्या खांबांवरून (बोलार्ड) उच्च न्यायालयाने पालिकेला खडसावले आहे. अंधेरीतील नागरिकही या बोलार्डमुळे त्रस्त आहेत. अंधेरी कुर्ला मार्गावर चकाला ते जे बी नगर पर्यंतच्या मार्गावर ठिकठिकाणी हे बोलार्ड लावलेले असून त्याचा अपंगांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांना देखील त्रास होतो आहे.
पदपथांवर बसवण्यात आलेल्या स्टीलच्या खांबांमधील (बोलार्ड) मधील कमी अंतरामुळे व्हीलचेअर वापरणाऱ्या अपंगांना अडचणींचा सामना करावा लागतो. या मुद्द्याची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली असून गेल्या आठवड्यात त्यावरून न्यायालयाने पालिका प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत. या बोलार्डमधील अंतर एक मीटर ठेवण्यात येईल, अशी हमी महापालिकेच्यावतीने न्यायालयात देण्यात आली होती. शिवाजी पार्क येथील करण शहा यांनी पदपथावरी बोलार्डमुळे अंपंगांना कसा त्रास होतो त्याची माहिती न्यायमूर्तींना कळवली होती. शहा हे जन्मापासून अपंग आहेत. शहा यांच्या ई मेलमुळे न्यायालयाने ही जनहित याचिका दाखल केली होती. त्यामुळे मुंबईच्या पदपथांवरील बोलार्डचा विषय ऐरणीवर आला आहे.
आणखी वाचा-गिरणी कामगारांसाठी ठाणे, कल्याण व्यतिरिक्त मुंबई महानगरातही घरे!
मुंबईत अनेक ठिकाणी असे बोलार्ड बसवण्यात आले असून त्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते पिमेंटा गॉडफ्रे यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून याबाबत तक्रार केली आहे. अंधेरी पूर्व परिसरात चकाला ते जे बी नगर परिसरात एक किलोमीटरच्या परिसरात बऱ्याच ठिकाणी असे बोलार्ड लावलेले असून त्याचा नागरिकांना त्रास होतो अशी तक्रार पिमेंटा यांनी केली आहे. हे बोलार्ड काढून टाकावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.