आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा अभिनेता इरफान खानचे बुधवारी निधन झाले. colon infection मुळे त्याला मंगळवारी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र बुधवारी सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. ५४ व्या वर्षी इरफानने जगाचा निरोप घेतला. जबर इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरवर मात केल्यानंतर तो भारतात परतला होता. लंडनमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. सप्टेंबर २०१९ मध्ये इरफान खान उपचारानंतर पुन्हा भारतात परतला होता.
‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’, ‘तलवार’, ‘हिंदी मीडियम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या होत्या. ‘पिकू’चे दिग्दर्शक शूजित सरकार यांनी ट्विटरद्वारे त्याला श्रद्धांजली वाहिली.
My dear friend Irfaan. You fought and fought and fought. I will always be proud of you.. we shall meet again.. condolences to Sutapa and Babil.. you too fought, Sutapa you gave everything possible in this fight. Peace and Om shanti. Irfaan Khan salute.
— Shoojit Sircar (@ShoojitSircar) April 29, 2020
इरफान खानने मार्च २०१८ मध्ये कॅन्सर झाल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर त्याने सर्व कामं थांबवली होती आणि उपचारासाठी लंडनला निघून गेला होता. २०१९ मध्ये परतल्यानंतर त्याने ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. चित्रपटातील अभिनयासाठी इरफान खानचं कौतुक करण्यात आलं होतं. सोबतच पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पदार्पण केल्याबद्दल आनंदही व्यक्त केला होता. १३ मार्च २०२० रोजी अंग्रेजी मीडियम चित्रपट रिलीज होणार होता. मात्र लॉकडाउनमुळे ६ एप्रिल रोजी डिजीटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज करण्यात आला. ‘अंग्रेजी मीडियम’ हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.
जवळपास ३० वर्षांच्या करिअरमध्ये इरफानने ५० हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं. बॉलिवूडसोबतच त्याने हॉलिवूडमध्येही छाप सोडली. कलाक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी २०११ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता.