मुंबई-एरव्ही कुठल्याही कारणासाठी ट्विटरचा आसरा घेणाऱ्या बॉलिवुडकरांनी मातृदिनाच्या निमित्ताने आपल्या आईबद्दलच्या भावना व्यक्त करण्यासाठीही त्याचाच आधार घेतला. आई म्हणजे ‘देव’, आई म्हणजे ‘पहिले प्रेम’, आई म्हणजे ‘सर्वात चांगली मैत्रिण’ अशा विविध विशेषणांनी सजवत बॉलिवुडकरांनी ट्विटरवर आपले मातृप्रेम साजरे केले.
अभिनेता अक्षय कुमारने, ‘जिच्यावर आपण पहिल्यांदा प्रेम केले ती स्त्री म्हणजे माझी आई’, अशा शब्दांत आईचे गोडवे गायले. अनुपम खेर यांनीही अक्षयचीच री ओढत सर्वाना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तर  दिया मिर्झाने आईबरोबरचे छायाचित्र सोशल साईट्सवर टाकत तिला अभिमान वाटेल असेच काम करणे हे आपले ध्येय असल्याचे स्पष्ट केले आहे.
‘गुलाब गँग’ करणाऱ्या दिग्दर्शक अनुभव सिन्हापासून आताच्या आयुषमान खुराणा, अमृता राव, बिपाशा बासू या सर्वानीच ट्विटरवरून आपापल्या आईबद्दल प्रेम व्यक्त केले आहे.

Story img Loader