नवीन वर्षांसाठी आपल्या नेहमीच्या जागेपासून दूर, जिथे आपल्याला प्रसिद्धीमाध्यमांपासून किंवा चाहत्यांपासून त्रास होणार नाही, अशा ठिकाणी जाण्याचा पायंडा बॉलीवूडजनांनी पाडला आहे. याहीवर्षी शाहरू ख खानपासून ते तुषार कपूपर्यंत अनेक कलाकार परदेशात नववर्षांचे स्वागत करणार आहेत. एकेकाळी नवीन वर्षांसाठी मोठी बिदागी घेऊन कार्यक्रम करण्यावर या कलाकारांचा भर होता. सध्या असे कार्यक्रम करण्यापेक्षा आपल्या वर्षभराच्या चित्रीकरणाच्या व्यग्र वेळापत्रकातून सुटका करून घेत मित्रपरिवारासमवेत मौजमजा करण्यावर बॉलीवूडमधील आघाडीच्या कलाकारांसह सगळ्यांचाच भर असतो.

‘दिलवाले’ चित्रपटाने २०० कोटी रुपयांचा जादुई आकडा पार पाडल्यामुळे नवीन वर्षांतील दोन चित्रपटांकडे वळण्याआधी दुबईतील आपल्या आलिशान बंगल्यात नवीन वर्ष साजरे करण्यासाठी शाहरूख खान उत्सुक आहे. तो कुटुंबीयांबरोबर दुबईत आहे. शाहरूखच्या चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टीने मात्र त्याच्या स्वभावाप्रमाणे आपल्या कुटुंबीयांपेक्षा त्याच्या तंत्रज्ञांच्या टीमला प्राधान्य दिले आहे. यावर्षी ‘दिलवाले’साठी मेहनत घेणाऱ्या आपल्या टीमला थंड हवेच्या ठिकाणी मोठी पार्टी रोहित शेट्टीने दिली असून तो त्यांच्याबरोबर नवीन वर्षांचे स्वागत करणार आहे. ‘जझबा’ चित्रपटातून पुनरागमन करणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक आणि आराध्यासह नाताळलाच न्यूयॉर्कला रवाना झाली आहे. दिग्दर्शक करण जोहरही यावेळी न्यूयॉर्क मध्ये आहे. तर यावर्षी दीपिका पदुकोणही आठवडाभर आधीच न्यूयॉर्कला रवाना झाली आहे. नेहमीप्रमाणे रणवीर सिंग मागाहून तिच्याबरोबर न्यूयॉर्क मध्ये नवीन वर्ष साजरे करणार आहे. अभिनेता वरूण धवनही एका मित्राच्या बॅचलर पार्टीच्या निमित्ताने बार्सिलोनाला पोहोचला आहे. हृतिक रोशनने मात्र नाताळचा पूर्ण आठवडा स्वित्र्झलडमध्ये मुलांबरोबर घालवला असून नवीन वर्षांच्या पूर्वसंध्येला ते मुंबईत आपल्या घरी असणार आहेत. सध्या ‘क्या कूल है हम’चा तिसरा सिक्वल आणि ‘मस्तीजादे’ या चित्रपटांमुळे चर्चेत असलेला तुषार कपूरही नवीन वर्षांसाठी दुबईत आहे. ‘बाहुबली’ या चित्रपटातील दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया आपल्या कुटुंबीयांबरोबर नॉर्थ कॅरोलिनात आठवडाभर वास्तव्याला आहे. करीना कपूर आणि सैफ अली खान हे जोडपेही स्वित्र्झलडमध्ये गस्ताद शहरातील त्यांच्या आवडत्या आलिशान हॉटेलमध्ये नव्या वर्षांचे स्वागत करणार आहे.

बॉलीवूडचे शोमन सुभाष घई यांनी मात्र नव्या वर्षांत ‘मुक्ता आर्ट्स’ या आपल्या प्रॉडक्शनला पूर्वीप्रमाणे चित्रपट निर्मितीत पहिल्या क्रमांकावर आणायचे असा निर्धार केला असून त्या कामाची सुरुवात करण्याआधी गोव्यात ते कुटुंबाबरोबर सरत्या वर्षांला निरोप देणार आहेत. एकता कपूर बालीत सद्धार्थ मल्होत्रा-अलिया भट हे नवे प्रेमी जोडपे मेक्सिकोला असतील, अशी चर्चा आहे. जवळपास डझनावारी बॉलीवूडजन यावेळी नवीन वर्षांसाठी परदेशात असणार आहेत.

Story img Loader