अवघ्या १८ व्या वर्षी सुरू झालेली कारकीर्द, सहा वर्षांत तीन चित्रपट आणि पदरी निराशा घेऊन संपवलेले आयुष्य.. अभिनेत्री जिया खानचा हा प्रवास बॉलीवूडमधील तिच्या सहकाऱ्यांना नि:शब्द करून गेला आहे. ग्लॅमर जगतातील स्ट्रगल, कामाच्या बाबतीतली असुरक्षितता, तडजोडी, कुणाचीच मदत नसली तर येणारी असहाय्यता आणि त्यातून होणाऱ्या शोकांतिका. जिया खानच्या आत्महत्येमुळे ‘लाईट्स-कॅमेरा-अ‍ॅक्शन’च्या झगमगाटाखाली दडलेले निर्दय वास्तव उघडे पडले आहे आणि म्हणूनच तिच्या जाण्याने धक्का बसताच सगळ्यांनी ट्विटरवर व्यक्त व्हायचा प्रयत्न केला असला तरी ते केवळ पोकळ शब्द आहेत. त्यामागे दडलेल्या भावना अजूनही नि:शब्दच आहेत. ‘काय ! जिया खान! काय घडले हे! हे असे होणे योग्य आहे? विश्वासच बसत नाही’, अशा प्रकारची प्रतिक्रिया जियाने आपल्या कारकिर्दीचा श्रीगणेशा ज्या बिग बी बरोबर केला त्यांनी दिली आहे. मुळात, या घटनेने सुन्न झालेल्या बॉलिवूडजनांना काय बोलावे हेच सुचत नसले तरी निर्माती-अभिनेत्री पूजा भट्ट हिने मात्र ‘ट्विटरवर दिसणारे बॉलिवूडचे हे प्रेम जर याआधीच जियाला दाखवले असते तर कदाचित अशी वेळ आली नसती’, अशी सणसणीत प्रतिक्रिया दिली आहे.
बॉलिवूडमध्ये जिया खानचा चेहरा आणला तो निर्माता-दिग्दर्शक रामगोपाल वर्माने. मूळची ब्रिटिश भारतीय असलेली जिया लंडनमध्येच वाढली. मणिरत्नमच्या ‘दिल से’मध्ये जियाने बालकलाकाराची भूमिका केली होती. सोळाव्या वर्षी तिला विक्रम भट्टच्या ‘तुमसा नही देखा’साठी विचारणा झाली होती. मात्र, तिचे वय अगदीच लहान पडल्यामुळे या चित्रपटात दिया मिर्झाची वर्णी लागली. त्यानंतर दोन वर्षांनी २००७ मध्ये अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘नि:शब्द’मध्ये तिला संधी मिळाली. या चित्रपटाचा विषयच अगदी संवेदनशील होता. एक संसारी गृहस्थ आणि त्याच्या मुलीच्या मैत्रिणीबरोबर जुळलेले त्याचे प्रेमसंबंध. पहिलाच चित्रपट रामगोपाल वर्माचा, त्यात बोल्ड विषय आणि नायक म्हणून थेट अमिताभबरोबर काम करण्याची संधी. जिया खानसारखी नशीबवान कलाकार नाही, अशी चर्चा त्यावेळी झाली. हा चित्रपट आपटला तरी तिच्या बोल्ड अवताराची आणि अभिनयाची वाहवा झाली. त्यानंतर जिया दिसली ती आमिर खानबरोबर ‘गजनी’मध्ये. तिचा अखेरचा चित्रपट ठरला तो २०१० साली आलेला अक्षयबरोबरचा ‘हाऊसफुल्ल’. जियाच्या फिल्मी करिअरची सुरुवात चांगली झाली तरी त्यामुळेच तिच्या स्वत:बद्दलच्या अपेक्षाही वाढल्या होत्या. त्या अपेक्षेला अनुरूप काम मिळत नसल्याने तिला निराशेने गाठले आणि मग तिने मृत्यूला..
जियाच्या मृत्यूनंतर संकेतस्थळांवर बॉलीवूडमधील दिग्गज प्रतिक्रियांचा पाऊस पाडत आहेत. तिच्याबद्दल हळहळत आहेत. पण, ‘ट्विटरवर दिसणारे बॉलिवूडचे हे प्रेम जर याआधीच जियाला दाखवले असते तर कदाचित अशी वेळ आली नसती’, अशी सणसणीत प्रतिक्रिया निर्माती, अभिनेत्री पूजी भट्ट हिने दिली आहे.