मुंबई : सत्तरच्या दशकांत ‘जंजीर’, ‘शोले’, ‘दीवार’सारखे एकापाठोपाठ एक सुपरहिट हिंदी चित्रपट लिहिणारी सलीम – जावेद ही पटकथाकार जोडी खूप वर्षांनी मंगळवारी एकत्र आली. एकेकाळी पटकथाकार म्हणून चित्रपटाचा नायक अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही सर्वाधिक मानधन घेणाऱ्या या जोडीच्या वैभवी कारकिर्दीचा इतिहास ‘अँग्री यंग मेन’ या तीन भागांच्या माहितीपटातून उलगडणार आहे. या माहितपटाच्या झलक अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने सलीम खान आणि जावेद अख्तर एकत्र आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एवढेच नव्हे तर लवकरच एका नव्या चित्रपटासाठी एकत्र कथालेखन करणार असल्याचेही यावेळी जावेद अख्तर यांनी जाहीर केले. सलीम खान आणि जावेद अख्तर या जोडीने हिंदी चित्रपटसृष्टीत इतिहास निर्माण केला. त्यांनी चित्रपट क्षेत्रात केलेली सुरुवात, पटकथा लेखनाची मिळालेली संधी आणि मग ‘हाथी मेरे साथी’पासून दोघांचा सुरू झालेला एकत्र प्रवास, एकापाठोपाठ एक लोकप्रिय चित्रपटांचे कथालेखन, पुढे यशोशिखरावर पोहोचल्यानंतर या दोघांमध्ये आलेला दुरावा हा सगळा रंजक प्रवास उलगडणाऱ्या ‘अँग्री यंग मेन’ या माहितीपटाची निर्मिती सलीम खान यांचा मुलगा अभिनेता सलमान खान आणि जावेद अख्तर यांची दोन्ही मुले अभिनेता-दिग्दर्शक फरहान व दिग्दर्शिका झोया अख्तर यांनी मिळून केली आहे. नम्रता राव यांनी दिग्दर्शित केलेल्या माहितीपटाच्या झलक अनावरण सोहळ्याला सलीम खान आणि जावेद अख्तर दोघेही आपल्या मुलांसह, कुटुंबियांसह उपस्थित होते.

हेही वाचा – अकरावी प्रवेश प्रक्रिया : दुसरी विशेष प्रवेश यादी जाहीर, १६ ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार

हेही वाचा – म्हाडाच्या सोडतीसाठी बनावट संकेतस्थळ… इच्छुक अर्जदारांची अशी होते आर्थिक फसवणूक

या सोहळ्यात बोलताना जावेद अख्तर यांनी आम्ही ठरवून एकत्र आलो नव्हतो, असे स्पष्ट केले. ‘लुटेरा’ चित्रपटासाठी आम्ही लेखक शोधत होतो, तेव्हा सगळीकडे शोधून देखील कोणी लेखक मिळाला नाही. तेव्हा मी स्वतः कथा लिहिण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सलीम खान यांनी तुम्ही उत्तम लिखाण करता, त्यामुळे तुम्ही संवाद लेखनही करू शकता असा विश्वास माझ्या मनात निर्माण केला. त्यानंतर आम्हा दोघांनाही एका पटकथेवर काम करण्याची संधी मिळाली. ते पाहून राजेश खन्ना यांनी ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटासाठी लेखन करण्यास आम्हाला सांगितले. आणि पुढे इतिहास घडत गेला. सलीम – जावेद हे नाव प्रसिद्ध होत गेले, अशी आठवण अख्तर यांनी सांगितली. आता सलीम-जावेद जोडी म्हणून आणखी एका चित्रपटाची कथा लिहिण्याची इच्छा आहे. सलीम यांच्याशीही त्याबाबत बोलणे झाले असून लवकरच आम्ही एकत्र काम सुरू करू, असे अख्तर यांनी जाहीर केले. त्यावेळी आम्ही सर्वाधिक मानधन घेत होतो, त्यामुळे आता आमची कथा घ्यायची तर तयारीत राहा… असा मिश्कील इशाराही त्यांनी निर्मात्यांना दिला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood popular screenwriter duo salim khan and javed akhtar will reunite mumbai print news ssb